पालकांनो पावसाळ्यात लहान मुलांना जपा; रात्री ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
By Appasaheb.patil | Published: August 11, 2022 03:30 PM2022-08-11T15:30:38+5:302022-08-11T15:30:58+5:30
ताप, खोकल्यांचे पेशंट वाढले; बालरोग तज्ज्ञांकडील ओपीडी वाढली
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पावसाळ्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतात. तापमानात सतत बदल होत राहतो. सलग पाऊस चालू राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. जागोजागी पाणी साचते. पाण्याची डबकी होतात. त्यामुळे चिलटे, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना यावेळी संसर्ग होण्याची भीती असते. नुकतीच रांगू लागलेली बाळे पटकन् काही वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.
पावसाळ्यात कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंग्यू हे आजार होतात. पावसाळ्यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, फुटलेली मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुने कॅन यात पाऊस साठतो. त्याने डेंग्यू व मलेरियाच्या डासांना (एडीस, ॲनोफॅलीस) आमंत्रण मिळते. त्यांची पैदास वाढते. हे दोन्ही आजार गंभीर होऊन जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात ऊन, वारा अन् पावसाचा सामना करावा लागतो. अशा बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार डोके वर काढू लागतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते त्यांना पावसाळ्यात आजार होण्याचा धोका जास्त असतो; पण बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना सर्वाधिक आजारांचा फटका बसतो. पावसाळ्यात मुलांना आजारांपासून रोखायचं असेल तर बाहेरचे पदार्थ खाण्यास देणं टाळा, घरचं शिजवलेलं, ताजे अन्न द्या असेही आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांनी केले आहे.
----------
पावसाळ्यात लहान मुलांना होणारे आजार
- - जुलाब
- - मलेरिया
- - उलट्या
- - गॅस्ट्रो
- - टायफॉईड
- - कॉलरा
- - डेंग्यू
----------
काय करायला हवे?
- - लहान मुलांना गाळून आणि उकळून पाणी द्या.
- - ताजे, गरम व शिजवलेले अन्न मुलांना द्या.
- - पावसात भिजू देऊ नका, ओले कपडे घालू नका
- - शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
-----------
त्वचेचे आजारही होऊ शकतो ?
पावसाळ्यात लहान मुलांना त्वचेसंदर्भातील आजारही होऊ शकतो. हा व्हायरल आजार आहे. हाता-पायाला रॅष येतात. हा आजार चार ते पाच दिवसात आपोआप कमी होतो. याला उपचाराची गरज नाही. पालकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये असे बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले आहे.
-----------
पावसाळ्यात लहान मुलांची जास्त काळजी घेणं महत्त्वाचे आहे. शक्यतो पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासोबतच जुलाबसदृश व संसर्गजन्य आजार सर्वात जास्त लहान मुलांना होतात. वेळीच काळजी अन् उपचार घेतले तर ते लवकर बरे होतात. कोणताही आजार मुलांना झाल्यास पालकांनी अजिबात घाबरू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेतल्यास मुलं लवकर बरी होतात.
- विक्रम दबडे, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर