अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे सोलापुरातील विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:10 PM2020-07-31T12:10:31+5:302020-07-31T12:10:37+5:30
मिशन अॅडमिशन : दहावी परीक्षा पास झालेल्यांसाठी आज वेळापत्रक जाहीर होणार
सोलापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यामुळे आता विद्यार्थी आणि पालक आपल्या यशाचा आनंद बाजूला सारत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी लक्ष देत आहेत. पालक आता मुलांच्या आवडीनुसार संबंधित शाखेसाठी महाविद्यालयाचा शोध घेत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर अकरावीसाठी मात्र ५९ हजार ४० जागा आहेत. उत्तीर्ण झालेल्यांपैकी अनेक विद्यार्थी हे आयटीआय, डिप्लोमा या क्षेत्राकडे वळत असतात. आता दहावीचा निकाल लागल्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचे प्रवेशाचे वेळापत्रक कधी जाहीर होईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अकरावीच्या पारंपरिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
सोलापूरच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली असून या वर्षी ९७.५३ टक्के निकाल लागला आहे. सोलापूर शहरात कला शाखेसाठी ५४४० जागा, विज्ञान शाखेसाठी ५१६० जागा आणि वाणिज्य शाखेसाठी ३७२० जागा आहेत. यंदा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी जास्त असल्यामुळे विज्ञान शाखेच्या मेरिट लिस्टवरही अनेकांचे लक्ष असणार आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
शहर जिल्हा एकूण
कला शाखा ५४४० २३२४० २८६८०
विज्ञान शाखा ५१६० १५८०० २०९६०
वाणिज्य ३७२० ३२४० ६९६०
संयुक्त ७२० १७२० २४४०
एकूण १५०४० ४४००० ५९०४०
याशिवाय सोलापूर शहरात डिप्लोमाची दहा महविद्यालये आहेत. २६८० जागा आहेत. आयटीआयच्या विविध २५ कोर्सेससाठी ८५६ जागा आहेत.