'परितेवाडी आदिवासी भाग, शाळा गोठ्यात भरते', ZP सभेत डिसलेंवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 10:18 AM2022-02-05T10:18:10+5:302022-02-05T10:20:59+5:30
जिल्हा परिषद शाळा, प्रशासन व गावाची बदनामी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभेत डिसले गुरुजींचा निषेध नोंदविण्यात आला
सोलापूर - ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील फुलब्राईट स्कॉलरशीपसाठी रजा देण्यावरुन जिल्हा प्रशासन आणि त्यांच्यात खटके उडाले होते. त्यानंतर डिसले गुरुजींच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता, सोलापूरजिल्हा परिषदेच्या सभेत रणजीतसिंह डिसलेंचा निषेध करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा, प्रशासन व गावाची बदनामी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभेत डिसले गुरुजींचा निषेध नोंदविण्यात आला. अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षेतेखाली शुक्रवारी ऑनलाईन सभा पार पडली. डिसले यांनी मानसिक त्रास दिला व पैशांची मागणी केली, असे वक्तव्य करुन बदनामी केल्याबद्दल या सभेत वसंतनाना देशमुख यांनी निषेध व्यक्त केला. प्रशासनाची बाजू ऐकून न घेता शिक्षणमंत्र्यांनी दबाव आणल्याचे नकाते यांनी म्हटले. तसेच, सीईओ दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी नियमाने कामकाज केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.
खोटी माहिती सादर केली.
भारत शिंदे म्हणाले, परितेवाडी माझ्या मतदारसंघात आहे. डिसले यांनी पुरस्कारासाठी सादरीकरण करताना परितेवाडी आदिवासी भाग आहे. येथील लोक कन्नड भाषिक आहेत. जिल्हा परिषदेची शाळा गोठ्यात भरते, येथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोट माहिती देऊन गावची बदनामी केली. परितेवाडीतील लोक संधन आहेत. बरेच बांधकाम कामगार कुटुंबीय व शेतकरी आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतरही डिसले यांच्या मार्गदर्शनाचा शाळेला उपयोग झाला नाही.
डिसलेंनी फोन उचलला नाही
जिल्हा परिषद सभेत सदस्यांनी निषेध केल्याबद्दल व पुरस्काराची खोटी माहिती दिल्याच्या आरोपाबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी डिसले यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी फोन उचलला नाही.