सोलापुर शहरातील पार्किंग समस्येमुळे बाजारपेठांवर प्रचंड परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:20 PM2019-03-07T18:20:40+5:302019-03-07T18:21:56+5:30
रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : ‘ओ मामा, इथे गाडी लावू नका’, त्या दुकानदाराचा सल्ला मानून तो ग्राहक दुचाकी ढकलतच पुढे ...
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : ‘ओ मामा, इथे गाडी लावू नका’, त्या दुकानदाराचा सल्ला मानून तो ग्राहक दुचाकी ढकलतच पुढे कुठेतरी लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसरा लगेच ओरडतो, ‘अहो काका, इथे नको. पोलीस उचलून नेतील’. त्यालाही तो सल्ला पटतो अन् काय करावं काय नाही, या चिंतेतच त्याने गाडी किक मारत तेथून निरोप घेतला.
हा प्रसंग मनात साठवून ‘लोकमत’चमूने शहरातील पार्किंग यंत्रणेवर प्रकाश टाकला. आॅन दि स्पॉट रिपोर्टिंगवेळी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे बाजारपेठ प्रचंड अस्वस्थ झाल्याचे निदर्शनास आले.
दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी सात रस्ता येथून चमू निघाला. संगमेश्वर महाविद्यालयापासून ते पुढे जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहने बिनधास्तपणे लावण्यात आली होती. दुचाकी गाड्या मात्र कमी प्रमाणात आढळल्या. रस्त्यावरच पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांना जॅमरही बसविण्याचे साधे कष्टही वाहतूक पोलिसांचे दिसून आले नाही. कामत हॉटेल ते हेडगेवार रक्तपेढीपर्यंतच्या व्यापारी आणि ग्राहकांसाठी महापालिकेच्या सह्याद्री शॉपिंग सेंटरमध्ये खास पार्किंगची व्यवस्था पाहावयास मिळाली. तरीही दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी या मार्गावर एमएच-१३/एसी-७६५२, टीएस-०९/ईजे-१८९२ आणि एमएच-१२/एफके-७४६० ही तीन चारचाकी (कार) वाहने थांबलेली चमूने कॅमेºयात बंदिस्त केली. हेडगेवार रक्तपेढीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोबाईल विक्रेत्यांनी मात्र पार्किंग नसल्याची खंत व्यक्त करताना ग्राहक दुरावल्याचे मोबाईल विक्रेते महेश चिंचोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गर्दीच्या बाजारपेठांमध्ये श्वास गुदमरतोय...
- शहरातील चाटी गल्ली, कुंभार वेस, सराफ बाजार, मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, माणिक चौक या चौकांमध्ये जुन्या काळापासून बाजार भरतोय. विस्तारलेल्या शहरातील ग्राहक खास खरेदीसाठी या बाजारपेठांमध्ये येत असताना त्यांनाही पार्किंगच्या समस्या भेडसावत आहेत. मंगळवारपेठ पोलीस चौकी ते मधला मारुती हा एकतर एकेरी मार्ग. ज्या वस्तू, साहित्य, वनौषधी कुठेच मिळत नाही, त्या सर्वच वस्तू इथे मिळतात; मात्र ग्राहकांना दुचाकी कुठे लावावी, हा प्रश्न नेहमीच भेडसावतो. रस्त्यावर बसलेले किरकोळ विक्रेते, लावण्यात आलेल्या वाहनांमुळे या प्रमुख बाजारपेठांसाठी महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करावी, असा सूर या भागातील व्यापाºयांमधून ऐकावयास मिळत होता.
‘किसमे कितना है दम !’ पोलिसांना इशारा
- दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी चमू टिळक चौकात पोहोचला. तेथील काही व्यापारी, ग्राहकांना बोलते केले असता ते म्हणाले, ‘साहेब, आमच्या गाड्या उचलतात. मग वाहतूक पोलिसांना टिळक चौकातील अगदी मध्यभागी बसून चुना विकणारे विक्रेते दिसत नाही का ? त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. वाहतूक पोलिसांमध्ये दम नाही का ? असे प्रश्न मांडत असताना एकाने ‘किसमे कितना है दम’ असे म्हणून थेट वाहतूक पोलिसांनाच आव्हान दिले.