पारावरच्या गप्पा; जरा जपून, हेर आलेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 03:04 PM2019-04-10T15:04:57+5:302019-04-10T15:05:22+5:30

.परवा सरपंच अन् देशमुख पारावर येऊन मतदान कुणाला करायचं, हे सांगून गेल्यापासून तर गावातलं संशयास्पद अन् भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं होतं..

Parrot chat; Just look at it! | पारावरच्या गप्पा; जरा जपून, हेर आलेत !

पारावरच्या गप्पा; जरा जपून, हेर आलेत !

googlenewsNext

रविंद्र देशमुख

रामसे बंधूंच्या सिनेमात जसं असतं अगदी तसंच भीतीजनक वातावरण गावात पसरलंय..चालताना रस्त्यावरच्या पाचोट्याचा जरी आवाज आला तरी गावकरी तपासून बघतात, आवाज कशाचाय म्हणून. झाड पानांच्या सळसळीमुळंही त्यांची पावलं थबकू लागलीयेत...थोरले तात्या सकाळी परसाकडंला जात होते. पांदीतून जाताना त्यांना सारखं कुणीतरी मागं मागं येतंय, याचा भास होत होता...मल्लू, पानाच्या टपरीवर थांबला तेव्हा त्याला नवीनच अनोळखी माणूस दिसला..अगदी बारकाईनं पण चोरट्या नजरेनं मल्लूचा चेहरा निरखत होता...घाबरून त्यानं तिथनं पळ काढला. शिरपा कुर्डूवाडीवरून एसटीनं आला तर त्याच्या मागच्या सिटावर बसलेला माणूस अगदी घरापर्यंत त्याच्या मागावर होता..ग्रॅज्युएट बबलूं तर सांगत होता, त्याचं सोशल मीडियाचे अकौंट हॅक झालंय...पाटलांच्या तात्याकडं घरातल्या सर्वच पोराबाळांची लग्नं झाली असताना, त्यांच्याकडं काल कुणीतरी आला अन् खानदानाची माहिती विचारायला लागला..जवळीकता साधायचा प्रयत्न करून अगदी इलेक्शनवरही बोलू लागला म्हणे..

पारावर जमलेले प्रत्येकजणच आपले हे अनुभव एकमेकांना कथन करीत होते...अगदी तणावपूर्ण वातावरण होतं..हरएकाच्या चेहºयावर भीती होती ..काय झालं आपल्या गावाला?...प्रत्येकजण चिंतेत होता..परवा सरपंच अन् देशमुख पारावर येऊन मतदान कुणाला करायचं, हे सांगून गेल्यापासून तर गावातलं संशयास्पद अन् भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं होतं..थोरले आबा अन् तात्यांच्या चेहºयावरील कमालीचा तणाव पाहून मल्लू म्हणाला, आबा, तात्या..गावात काय भुताटकी झालीय का? अहो, वाºयानं दरवाजा हलला तरी भ्या वाटतीया..काल दुपारी येळभर घोंगडं आथरून पडलो होतो..डोळा लागला होता; पण आमची धाकली कारटी खेळत खेळत तिथं आली तिच्या बी पावलाचा आवाज ऐकून छातीत धडधड व्हायला लागली.. ग्रॅज्युएट बबलू सांगू लागला..तात्या, काल रात्री दोन वाजता माझा मोबाईल खणखणला..फोन उचलून हॅलो, हॅलो म्हणतोय पण तिकडनं कोणताच आवाज येत नव्हता..

आबानं, सर्वांचं ऐकून घेतल्यावर आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली..समद्यांनो ऐका, गावात एकदा हाकामारी आल्याची हाळी उठली व्हती..आपण सर्वेचजण कसं घाबरलो होतो...दारावर पांढरे पट्टे रंगविले व्हते...पांढरा रंग लावून एक गोल दगुड प्रत्येकानं घराच्या उंबºयाजवळ ठेवला होता...तश्शी भ्या वाटायला लागलीय..काल राती तर घरातले आम्ही सगळेच जागं व्हतो. सुनबाईच्या अंगात ताप भरला होता भीतीनं. लेकराबाळाच्या डोळ्याला बी डोळा लागला नाय...बबलूनं विचारलं काय झालं आबा? काय सांगू बबल्या, रात्रीच्याला कोण तर सारखं दरवाजा बडवत असल्यासारखं वाटत हुतं..जाऊन बघतो तर कोणच नाय..दोन -तीन येळा असंच झालं. आबांची ही आपबीती ऐकून पारावर जमलेल्या सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. प्रत्येकांच्या चेहºयावरची भीती वाढली...एकमेकांकडं निशब्द होऊन सारे पाहू लागले...इतक्यात लगबगीनं एसटी स्टँडकडं जाताना शिरपा दिसला..मल्लूनं हाक मारली म्हणून तो पाराकडं आला..आबा, तात्याला राम राम करून त्यानं बुड टेकवलं...काय ओ, काय झालं, अस्सं घाबरल्यासारखं काय दिसताय संमदी?..आबा अन् तात्यानं त्याला सारं सांगितलं. शिरपाही उसळून म्हणाला, तात्या, परवा माझ्याबी मागावर एक माणूस व्हुता..म्हणजे हे सर्व्यांच्या बाबतीत व्हायला लागलंय व्हय!...पण आता मला समजलंय, ह्यो बघा पेपर अन् वाचा ही बातमी..ग्रॅज्युएट बबल्यानं शिरपाच्या हातातला पेपर ओढून बातमी वाचू लागला..‘विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले डिटेक्टिव्ह’...‘प्रतिस्पर्ध्यांवर ठेवतात पाळत’...मल्लू म्हणाला, व्हयं की रं बबल्या, इलेक्शनमुळं आता आपल्यावर पाळत ठेवली जातेय..कोण कुठं जातंय?, कुणाशी बोलतंय?..सरपंचाच्या वाड्यावर कुणाची बस-उठं हाय, देशमुखाच्या गढीवर कोण राबता घालतंय?..हे सारं बघितलं जात असंल नव्हं...शिरपा म्हणाला, व्हयं, आता आबा अन् तात्याच्या जमान्यातलं इलेक्शन राहिलं नाय...एका मतासाठी मारा मार व्हतीया...जर जपून, हेर आलेत गावात!..शिरपाचं बोलणं सर्वांनाच पटलं अन् जो तो निवडणुका संपण्याची वाट बघू लागला.

Web Title: Parrot chat; Just look at it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.