सोलापुरात रविवारी दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण; पंजाब, हरियाणात कंकणाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:21 PM2020-06-19T14:21:11+5:302020-06-19T14:24:13+5:30
सोलापुरात सकाळी १०.७ वाजता प्रारंभ तर दुपारी १.३५ ला ग्रहणमोक्ष
सोलापूर : देशात बहुतांश भागात रविवारी २१ जून रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे. सोलापुरात खंडग्रास स्थितीत हे ग्रहण दिसणार असून, सकाळी १०.०७ वाजता ग्रहणास सुरुवात होणार आहे, अशी माहिती सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक राहुल दास यांनी दिली.
जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे जातो तेव्हा दिसणाºया स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हटले जाते. या प्रकारच्या सूर्यग्रहणामध्ये चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही, म्हणून या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात.
कंकणाकृती ग्रहण हेदेखील खंडग्रास ग्रहण आहे. मात्र, यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा समजला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे आहे हे ठरवले जाते.
सोलापूरमध्ये ग्रहणाचा प्रारंभ सकाळी १० वाजून ७ मिनिटे ३० सेकंदाला होईल. ग्रहणाचा मध्य हा सकाळी ११ वाजून ३५ मिनिटे ५० सेकंदाला असणार आहे, तर ग्रहणमोक्ष दुपारी एक वाजून ३५ मिनिटे ५० सेकंदाला होणार आहे. ग्रहणाचा मध्य ११.४६ वाजता असल्याने या वेळेस ग्रहण अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येणार आहे.
विज्ञान केंद्राच्या फेसबुक पेजवर ग्रहण लाईव्ह
- यापूर्वी झालेले ग्रहण पाहण्यासाठी विज्ञान केंद्रातर्फे शहरात विविध ठिकाणी दुर्बीण तसेच इतर साधनांची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा देखील तसेच नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा असा उपक्रम घेण्यात येणार नाही. याऐवजी सोलापूर विज्ञान केंद्राच्या फेसबुक पेजवर सकाळी १०/०७ ते दुपारी ०१.३५ दरम्यान सूर्यग्रहण हे लाईव्ह पाहता येणार असल्याचे राहुल दास यांनी सांगितले.
ग्रहण पाहताना सूर्याकडून येणाºया किरणांमुळे डोळ्यांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण पाहताना पिनहोल कॅमेरा, टेलिस्कोप, सोलार एक्लिप्स गॉगल यांसारख्या वस्तूंचा वापर करायला हवा. लहान मुलांनी ग्रहण पाहताना पालकांचा सल्ला घ्यावा. ही खगोलीय घटना अनुभवायला हवी.
- राहुल दास,
संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र.
ग्रहणाच्या दिवशी कोणाच्या मृत्यूनंतरचा दहावा किंवा अकरावाचा विधी येत असेल तर सकाळी दहा वाजण्यापूर्वी वेधकाळात अंत्यकर्म करता येईल किंवा दुपारी १.३० नंतर मोक्षस्नान करून सुद्धा करता येईल. मात्र, २१ जूनला कोणाकडे बाराव्याचे किंवा तेराव्याचे कर्म असेल तर ते ग्रहणाच्या दुसºया दिवशीसुद्धा करता येईल. तसेच ग्रहणाच्या दिवशी यंदा प्रतिपदा तिथीचे प्र्रथम वर्षश्राद्ध किंवा वार्षिक श्राद्ध असेल तर ते वेधकाळात सपिंडक करून आमान्नाने करावे किंवा दुपारी १.३० नंतर मोक्षस्नान करून वरीलप्रमाणे आमान्नाने किंवा मोक्षस्नान झाल्यावर नेहमीप्रमाणे श्राद्ध स्वयंपाक सुरू करून सुद्धा करता येईल. मात्र अपरान्ह काळात दुपारी ४ पूर्वी श्राद्ध संकल्प करून कर्म सुरू करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, खाणे-पिणे ही कर्मे करू नयेत. ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
- मोहन दाते, पंचांगकर्ते, सोलापूर.