राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडून गेलेल्यांना पक्षाने वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:38 PM2019-09-18T12:38:16+5:302019-09-18T12:40:36+5:30
संस्थाने खालसा होतील: राष्ट्रवादीच्या बैठकीत जुन्या नेत्यांवर रोष व्यक्त करा; सत्ता गेली म्हणून पक्ष सोडल्याचा आरोप
सोलापूर : पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्ह्यातील नेत्यांची संस्थाने खालसा होतील, अशी टीका उमेश पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाºयांची हुतात्मा स्मृती मंदिरातील बैठक मार्गदर्शनासाठी आयोजित केली होती. या बैठकीत पक्ष सोडून जाणाºया नेत्यांवर आगपाखड करण्यात आली. रूपाली चाकणकर म्हणाल्या, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी आजच्या सभेकडे पाहायला हवे. इथे उपस्थित असलेला कार्यकर्ता पक्ष सोडून गेलेल्यांविरुद्ध रान पेटविणार आहे. शरद पवारांनी अनेकांना पदे, मानसन्मान दिला. सत्ता गेली म्हणून अनेक लोकांनी पक्ष सोडला. या लोकांना मी याच व्यासपीठावरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
उमेश पाटील म्हणाले, आपली संस्थाने बंद पडतील म्हणून जिल्ह्यातील काही लोकांनी पक्ष सोडला. त्यांची संस्थाने खालसा करण्याचे काम शरद पवार करणार आहेत. पक्ष सोडून ज्यांनी ज्यांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, तो खंजीर उलटा करून त्यांना उत्तर देण्यात येईल.
बळीराम साठे, लोकसभेत पक्षाला म्हणावे तसे यश आले नाही. ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे हे घडले. पवारांनी आतापर्यंत ज्यांना मोठं केलं, ज्यांच्या हिताचा बारकाईने विचार केला ते लोक सर्वांना सोडून चालले आहेत. मंचावर बसलेले सगळेच भावी आमदार आहेत.
संतोष पवार म्हणाले, आमच्यात मतभेद असले तरी आम्ही पवारांसाठी एक आहोत. नेते सोडून गेले असले तरी कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे.
युवा नेत्यांकडे जिल्ह्याची सूत्रे द्या...
- साहेब, दुसºया फळीतील युवा नेत्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी द्या, अशा आशयाचे फलक घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी पवारांसमोर घोषणा दिल्या. पक्ष सोडून गेलेल्यांच्या विरोधात लढणारा युवा चेहराच पक्ष वाढवू शकतो, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांची मदत करण्याऐवजी जनादेश घेत फिरतात
- सांगली, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पूरस्थिती उद्भवली. हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मी तिथे चार दिवस त्या भागात होतो. संकटाच्या काळात राज्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या पाठीशी राहायला हवे होते. मी किल्लारी भूकंपाच्या काळात सोलापुरात मुक्कामाला थांबून दररोज उस्मानाबाद, लातूरला दौरा करीत होतो. पण आमचे राज्यकर्ते हेलिकॉप्टरने एक चक्कर मारून आले. त्यानंतर पत्ता नाही. आता महाराष्ट्रात जनादेश घेण्यासाठी फिरत आहेत. त्यांच्या हातात सत्ता देणार का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्या सभेत मनसेचे गाणे
- कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमास्थळी राष्ट्रवादी पक्षाची जोशपूर्ण गीते लावण्यात आली होती. यादरम्यान काही वेळ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणे लावण्यात आले होते.