पूर्वी पावसाआभावी, तर आता रोजच्या पावसाने पेरणीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:08+5:302021-07-14T04:26:08+5:30
माळशिरस तालुक्यातील खरीप हंगामाची परवड अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला काही गावांमध्ये पाऊस झाला. मात्र बहुतांश गावात पावसाने चकवा दिल्यामुळे ...
माळशिरस तालुक्यातील खरीप हंगामाची परवड अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला काही गावांमध्ये पाऊस झाला. मात्र बहुतांश गावात पावसाने चकवा दिल्यामुळे पेरणी प्रक्रिया रखडली होती. गेल्या आठवड्यात पुन्हा पेरणीयोग्य पाऊस झाला. मात्र हा पाऊस रिमझिम स्वरूपात दररोज हजेरी लावत असल्यामुळे पेरणी करण्यासाठी पावसाच्या विश्रांतीची बळीराजाला गरज भासत आहे. एकूणच पावसामुळे लांबलेली पेरणी पुन्हा पावसामुळेच खोळंबल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
शेतकऱ्याला पेरणीची चिंता
सध्या तालुक्यात पेरणीबाबतची चिंता बळीराजाला सतावत आहे. एकीकडे पाऊस व पाणी पातळी चांगली असल्यामुळे खरिपाबाबत आशादायी असताना पेरणी प्रक्रियाच रखडल्यामुळे चिंतेची बाब बनली आहे. सध्या तालुक्यात काही गावांमध्ये दमदार पाऊस झाला असला तरी सर्वत्र आवश्यक तेवढा पाऊस नाही. मात्र पेरणी करण्यात इतपत सर्वत्र पाऊस झाला आहे. दररोज सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘वेट अँड वॉच’ करावे लागणार आहे. त्यामुळे पाऊस असूनही आणि नसूनही पेरणीची चिंता शेतकऱ्याला कायम आहे.