सोलापुरातील चादरींवर येणार पतंजली ब्रॅण्ड, रामदेव बाबांच्या हालचाली सुरू, यंत्रमागधारकांची सोलापूरात घेणार मार्चमध्ये बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:47 AM2018-02-08T11:47:41+5:302018-02-08T11:51:24+5:30
योगगुरू रामदेव बाबा आयुर्वेद औषधे व इतर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात पतंजलीचा केलेला ब्रॅण्ड आता सोलापुरी चादरींवरही उमटणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : योगगुरू रामदेव बाबा आयुर्वेद औषधे व इतर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात पतंजलीचा केलेला ब्रॅण्ड आता सोलापुरी चादरींवरही उमटणार आहे. मार्च महिन्यात सोलापूर दौºयावर येणाºया योगगुरू रामदेव बाबांनी या दृष्टीने तयारी केली आहे.
अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे १७ ते १९ मार्चदरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत महायोग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दौºयादरम्यान पंढरपूर येथील महादेव बागल यांनी रामदेव बाबांच्या उपस्थितीत १८ मार्च रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानंतर पतंजली आॅल इंडिया योग समितीतर्फे याच दिवशी सायंकाळी ५ वा. इंदिरा गांधी पार्क स्टेडियममध्ये रामदेव बाबा, सिनेअभिनेत्री हेमामालिनी, अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्याअगोदर रामदेव बाबा सोलापुरातील यंत्रमागधारकांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सोलापुरी चादर पतंजलीच्या ब्रॅण्डमध्ये आणण्यासाठी यंत्रमागधारकांचा सहभाग घेण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे सोलापुरी चादर पतंजलीच्या माध्यमातून देशपातळीवर जाणार आहे.
१८ मार्च रोजी होणाºया महिला मेळाव्याच्या तयारीसाठी पतंजली महिला समितीच्या राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, जिल्हा प्रभारी सुजाता शास्त्री, भारत स्वाभिमानीच्या जिल्हा महामंत्री, नगरसेविका संगीता जाधव यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. मेळाव्याच्या तयारीसाठी पार्क स्टेडियमची पाहणी करून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व त्या जबाबदाºया उचलण्याचे आश्वासन महापौर बनशेट्टी यांनी दिले. त्याचबरोबर योगगुरू रामदेव बाबा यांना मनपातर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात यावे, असा प्रस्ताव नगरसेविका संगीता जाधव यांनी सभागृहाकडे दिला आहे. या महिला मेळाव्यास राज्यभरातून सुमारे एक लाख महिला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे भक्तनिवास मिळावे, यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.