कोरोनामुक्तीकडे वाटचाल; तीन कोविड सेंटर बंद, २९ रुग्ण घेताहेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:05+5:302021-06-17T04:16:05+5:30
कोरोनाने दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात थैमान घातले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू केले. ...
कोरोनाने दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात थैमान घातले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू केले. प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. धनंजय सरोदे, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. संजय कांबळे, डॉ. वर्षा पवार, डॉ. भीमराव पडवळे, डॉ. श्रीपाद माने, फार्मसी ऑफिसर सी. वाय. बिराजदार, हणमंतराव कलादगी, विस्तार अधिकारी प्रदीपकुमार भोसले, आरोग्य सेवक, तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची कडक अंमलबजावणी केली. पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा देत आरोग्य विभागही जिवाची बाजी लावताना दिसत आहे.
गावागावातील प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा पहिला डोस कसा देता येईल, याचे योग्य नियोजन करत पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण केले आहे. सध्या गावोगावी उभारलेल्या विलगीकरण कक्षांची पाहणी करत ग्रामस्तरीय दक्षता समितीसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे कोरोना संक्रमण साखळी खंडित झाली आहे. आज संपूर्ण तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा
तालुक्यात कोरोना चाचणी केलेल्या ८२,८०९ पैकी ८ हजार ७४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यासाठी तालुक्यात ३ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आली. त्यामुळे ८ हजार ३५८ जणांना जीवदान मिळाले. या कोविड सेंटरमुळे नागरिकांचा सुमारे कोट्यवधीचा वैद्यकीय खर्च वाचला असल्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. प्रशासनाने २१ हजार ६७२ नागरिकांचे लसीकरण केले आहे. १५ जूनपासून तीनही कोविड सेंटर बंद झाली आहेत. १५ जून रोजी ग्रामीण रुग्णालयासह पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या २३५ अँटिजन चाचणीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे सध्याची आकडेवारी पाहता जूनअखेर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरणार आहे.
कोट :::::::::::::::::
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाची साखळी कशी तोडावी याबाबत मोठे आव्हान होते. मात्र, तालुक्यातील नागरिक, संस्था पदाधिकाऱ्यांनी भरीव सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, हे सामूहिक यश आहे.
- उदयसिंह भोसले
प्रांताधिकारी, मंगळवेढा
कोट ::::::::::::::::::
तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे, वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. नंदकुमार शिंदे
वैद्यकीय अधिकारी, मंगळवेढा