पुरातून बाहेर काढलेेले पाथरीचे शेतकरी कुटुृंब मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:11+5:302021-03-10T04:23:11+5:30
सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात उत्तर सोलापूर तालुक्यात संततधार व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. सीना नदीकाठच्या शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, ...
सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात उत्तर सोलापूर तालुक्यात संततधार व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. सीना नदीकाठच्या शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगावला पाण्याने वेढा दिला होता. खालून व वरुन पाणी शिरल्याने कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. पाणी वाढत गेल्याने गावालगतच्या वस्त्यावरील नागरिकांना एन.डी.आर.एफ.च्या जवानांनी बाहेर काढले होते. अशावेळी नुकसानीचे पंचनामे संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी करायला हवे होते. मात्र तसे झाले नसल्याने पाथरी येथील ५० कुटुंब मदतीपासून वंचित राहिले असल्याचे पत्र सरपंच लक्ष्मी मळगे व उपसरपंच श्रीमंत बंडगर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना दिले आहे.
पाऊस पडला होता, पाणी घरात शिरल्याने कुटुंबांना बाहेर काढले होते हे तहसीलदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहीत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
----
शेतकऱ्यांना मदत करा, संबंधितांवर कारवाईची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी वारंवार मागणी करुनही दिली जात नाही व शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतही मिळत नसल्याचे ग्रामपंचायतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सदोष पंचनामे केल्याने अनेकांना अत्यल्प मदत मिळाली तर ५० कुटुंब मदतीपासून वंचित राहिल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५६ संबंधितावर कारवाई करावी. शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.