कोरोना काळात बार्शीच्या वैद्यकीय सेवेचा ११ तालुक्यातील रुग्णांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:54+5:302021-04-18T04:21:54+5:30
बार्शी : कोरोना महामारीत बार्शीत असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे केवळ बार्शीच नव्हे तर उस्मानाबाद, अहमदनगर, बीड आणि पुणे जिल्ह्यातील काही ...
बार्शी : कोरोना महामारीत बार्शीत असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे केवळ बार्शीच नव्हे तर उस्मानाबाद, अहमदनगर, बीड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यातील रुग्णांना याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. सध्या बार्शीत ११ तालुक्यांतील ४८० रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोविड सेंटरमध्ये त्रास नसलेले ४०० जण वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत.
बार्शीत जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर, हिरेमठ या हॉस्पिटलसह १००च्या आसपास हॉस्पिटल आणि क्लनिक आहेत. गतवर्षी कोरोनाची लाट सुरू झाली व बार्शीत रुग्ण सापडू लागले तेव्हा डॉक्टरांसह सर्वांच्या मनात मोठी भीती होती. त्यावेळी सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. संजय अंधारे यांनी स्वतःहून आपले हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल करून उपचार सुरु केले. त्याचा मोठा फायदा बार्शीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांना झाला. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस रोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, आणि आयुर्वेदिक व होमिओपॅथीचे दहा डॉक्टर सेवा देत आहेत.
यानंतर रुग्ण वाढल्याने डॉ. जगदाळेमामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल येथेही कोरोनावर उपचार होऊ लागले. सुविधा हॉस्पिटलसह अनेक डॉक्टर पुढे आले.
आता बार्शीत दोन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि आठ हेल्थ केअर सेंटर रुग्णांवर उपचार करत आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आणि शहरातील इतर खासगी डॉक्टरांचेही योगदान आहे. शिवाय ५००पेक्षा जास्त तरबेज असा नर्सिंग स्टाफ यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. शहरात १०च्या जवळपास उच्च दर्जाच्या लॅबही आहेत. एचआरसीटी काढण्यासाठी तीन सिटी स्कॅन सेंटर आणि १० एक्स-रे सेंटर बार्शीत आहेत. न्यूरॉलॉजी सेंटरही आहे.
बार्शीत माढा, करमाळा, मोहोळचा काही भाग, भूम, परांडा, वाशी, कळंब, उस्मानाबाद, केज, आंबेजोगाई, जामखेड या अकरा तालुक्यांतील रुग्ण उपचार घेत आहेत.
बार्शी शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये ४८० आणि कोविड केअर सेंटरमध्ये ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. यात ३३६ बेड हे ऑक्सिजनचे, ९६ बेड आयसोलेशन तर ४८ बेड हे आयसीयूचे आहेत. सध्या बार्शीत ऑक्सिजनचे दोन आणि आयसोलेशनचे पाच बेड शिल्लक आहेत.
तसेच आगामी तीन-चार दिवसात १०० ऑक्सिजन, दहा व्हेंटिलेटर व ३०० खासगी कोविड केअर सेंटर सुरू होणार आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले.
यंत्रणा सुरळीत करण्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यासह प्रशासकीय यंत्रणा, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, सभापती अनिल डिसले, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.
-----
११० जणांनी दिला प्लाझ्मा
सध्या ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. बार्शीत श्रीमान रामभाई शहा ब्लड बँकेमुळे प्लाझ्माची सोय आहे. यासाठी ब्लड बँक सतत कोरोना होऊन गेलेले व शरिरात अँटिबॉडीज तयार झालेले दाते शोधत आहे. आतापर्यंत ११० जणांना प्लाझ्मा दिला असून, कोरोना होऊन गेल्यास २८ दिवस झालेल्यांनी पुढे येऊन तो दान करावा, असे आवाहन अजित कुंकुलोळ यांनी केले आहे.
अशी आहे टीम
बार्शीत एम. डी. फिजिशियन १४ तर एमबीबीएस, एम. एस. व इतर सर्व शाखांचे मिळून ११० डॉक्टर आहेत तर आयुर्वेदिकचे १२५ आणि होमिओपॅथीचे ५० असे डॉक्टर आहेत. शिवाय १७० मेडिकलही आहेत. त्यामुळे कोणते औषध मिळत नाही, असे होत नाही.
------