सोलापूर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये जेवणासाठी रुग्णांना पाहावी लागते वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 03:44 PM2021-05-18T15:44:29+5:302021-05-18T15:45:16+5:30

मुलांची अडचण: नातेवाईकांनाच सांगितले जाते काहीतरी पाठवा

Patients have to wait for a meal at Kovid Center in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये जेवणासाठी रुग्णांना पाहावी लागते वाट

सोलापूर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये जेवणासाठी रुग्णांना पाहावी लागते वाट

Next

सोलापूर : जिल्ह्यात मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ३४ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यात जवळपास सात हजार रुग्ण दाखल असून, जेवणाची व्यवस्था व्यवस्थित होत नसल्याबाबत सर्वाधिक तक्रारी आहेत. वेळेवर नाश्ता व जेवण येत नसल्याने रुग्णांची अडचण होत आहे. मुलांच्या व्यवस्थेचा विचारच न झाल्याने बिस्किटे पाठवून देण्याबाबत नातेवाईकांना निरोप दिला जात आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना १० ते १४ दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सोलापुरात ४ तर ग्रामीणमध्ये ३० कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी पाच हजार लोकसंख्येच्या गावात लोकसहभागातून ६० कोविड केअर सेंटर सुरू केले.

जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी चहा, नाश्ता, जेवण व संध्याकाळचे जेवण अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम विभागामार्फत जेवणाचे टेंडर दिले गेले आहे. जेवण पुरविणाऱ्यांना मेनू व जेवणाची वेळ ठरवून दिलेली आहे. पण संचारबंदीच्या काळात पुरवठादारांसमोर कच्चा माल व कर्मचाऱ्यांची अडचण असल्याने जेवण वेळेत जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुलांची अडचण होते. तेथील काळजीवाहक नातेवाईकांना मुलांसाठी काहीतरी ड्रायफूड्स‌ पाठवा असा निरोप देतात. दुसऱ्या दिवशी नागरी आरोग्य केंद्रातून इतर पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये ही न्याहारी नातेवाईक रवाना करताना दिसून आली.

जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर - ३४

या सेंटर्समध्ये सध्या दाखल रुग्ण - ५,१००

 

सिंहगड, खेड, केटरिंग कॉलेज कोविड सेंटरमध्ये चांगले जेवण

मनपाच्या सिंहगड, झेडपीच्या केटरिंग कॉलेज व खेड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये चांगले जेवण देण्यात येत असल्याचे येथे उपचार घेतलेल्या रुग्णांनी सांगितले. पण मुलांसाठी वेगळी यंत्रणा हवी, असेही मत मांडण्यात आले. मोहोळ येथे सुरू करण्यात आलेल्या दोन कोविड सेंटरमध्येही चांगल्या सोयी देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गावाजवळ सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये घरचा डबा देण्याची सोय करण्यात आली आहे. जेवणाच्या मेन्यूमध्ये प्रोटीनयुक्त कडधान्ये, फळभाज्या, डाळी व फळांचा समावेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

नेहरू वसतिगृह

ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हा परिषदेने सोलापुरातील नेहरू वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केले. या सेंटरसाठी शिक्षक, पतसंस्थांनी मदत केली. उत्तम व्यवस्था करूनही ग्रामीण भागातील रुग्ण येथे येण्यास तयार झाले नाहीत. दक्षिण सोलापूरच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड सेंटरला रुग्णांची सर्वाधिक पसंती दिसून आली.

म्हाडा सेंटर

जुळे सोलापुरातील म्हाडाच्या नवीन इमारतीत महापालिकेने कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे राहण्याची चांगली सोय असल्याने रुग्णांची चांगली पसंती आहे. शहराजवळच हे कोविड केअर सेंटर असल्याने सुरुवातीला जेवणाची चांगली व्यवस्था नव्हती. पण रुग्णांनी ओरड केल्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चांगली व्यवस्था केली.

सिंहगड सेंटर

सिंहगड कोविड सेंटरमध्ये सकाळी ८ वा. चहा, १० वा. नाश्ता. १२.३० वा. सकाळचे जेवण व रात्रीचे जेवण ८ वा. देण्यात येते, असे तेथे उपचार घेतलेल्या एका रुग्णाने सांगितले. हे सेंटर बरेच जुने असल्याने व्यवस्था चांगली असल्याचे सांगण्यात आले. कधी उशीर झाल्यावर मात्र रुग्ण ओरड करतात.

पोलीस सेंटर

पोलीस सेंटरवरही सकाळी ८ वा. चहा, १० वा. नाश्ता व दुपारी १२.३० वा. सकाळचे जेवण येते. रात्रीचे जेवण मात्र ८.३० वा. येते, असे सांगण्यात आले. या ठिकाणी महिला रुग्ण जास्त असल्याने त्यांच्यासोबत आलेल्या मुलांची मात्र आबाळ होते, असे सांगण्यात आले.

कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना जेवण वेळेवर व चांगले देण्यात यावे, अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त केले आहेत. वेळावेळी तपासणी होते. अलीकडच्या काळात जेवणाबाबत तक्रारी कमी झालेल्या आहेत.

डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Patients have to wait for a meal at Kovid Center in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.