संजयमामांना शह देण्यासाठी पाटील-बागल गट मोट बांधतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:32+5:302021-04-03T04:19:32+5:30
विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात आ. संजयमामा शिंदे यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागले आहे. आ. संजयमामा शिंदे व माजी आ. जयवंतराव ...
विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात आ. संजयमामा शिंदे यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागले आहे. आ. संजयमामा शिंदे व माजी आ. जयवंतराव जगताप यांचे गट एकत्र आले. आता आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आ. संजयमामा व जगताप गटाला रोखण्यासाठी एकमेकांचे विरोधक असलेले माजी आ. नारायण पाटील व बागल गटाचे नवे राजकीय समीकरण उदयास येऊ पाहत आहे. नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बागल व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी युती करून लढविल्या आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जगताप गटाबरोबर असलेली नारायण पाटलांची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी संजयमामा शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर पाटील गट जगताप गट यांच्या विषयी उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहे. बाजार समितीत नारायण पाटील यांचे समर्थक सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर बागल गटाच्या संचालकाबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून आहेत. तिथीनुसार झालेल्या शिवजयंती निमित्त आयोजित आरोग्य शिबिरात आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून माजी आ.नारायण पाटील यांचे समर्थक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, भरत आवताडे यांनी बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे, दिग्वीजय बागल यांना कार्यक्रमास निमंत्रित केले. उपजिल्हा रूग्णालयात झालेल्या नेत्रतपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आ. नारायण पाटील व बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे उपस्थित होते.
कोट :::::::::
आगामी नगरपरिषद निवडणुकीत बागल गट शक्यतो स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे. पण विरोधकांना रोखण्यासाठी ऐन वेळी परस्थितीनुसार युतीचा पर्याय नेते घेतील.
- चिंतामणी जगताप,
बागल समर्थक
कोट :::::::
सत्ताधा-यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्रित करून आगामी निवडणुका लढविण्यासाठी आम्ही आतापासूनच प्रयत्न करीत आहोत. निवडणुकीच्या तोंडावर वेगळेच चित्र पाहावयास मिळेल.
- महेश चिवटे,
नारायण पाटील समर्थक
फोटो
०२करमाळा०१
ओळी
करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतपासणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी माजी आ. नारायण पाटील व बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे एकत्रित दिसत आहेत.