पाटणे यांना नको, क्षीरसागरच सचिव राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:09+5:302021-09-07T04:28:09+5:30
करमाळा बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे सचिवपदाचा ...
करमाळा बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे सचिवपदाचा पदभार सोपविला व बाजार समितीत नवीन वादाला तोंड फुटले. सभापती बंडगर व बागल गटाला सचिवपदाचा पदभार क्षीरसागर यांच्याऐवजी पाटणे यांच्याकडे सोपवा अशी मागणी केली. सभापती बंडगर यांनी पणन संचालक यांच्याकडे तक्रार करत सचिव पदभाराबाबत जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची २९ जून रोजी झालेल्या बैठकीत समसमान मते पडल्यामुळे सभापतींच्या निर्णायक मताच्या आधारे पाटणे यांचा ठराव मंजूर झाला. परंतु या बैठकीत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी कर्मचारी सेवानियम व कायद्याच्या तरतुदी अवगत करत तशी इतिवृत्तात नोंद केली होती. पाटणे यांचा ठराव मंजूर झाला पण क्षीरसागर यांनी चार्ज देण्यास ठामपणे नकार देत ठरावाच्या विरोधात पणन संचालकांकडे अपील दाखल केले. त्यावर पणन संचालकांनी १२ जुलै रोजी स्थगिती आदेश दिल्यामुळे क्षीरसागर यांच्याकडेच सचिवपदाचा पदभार होता. त्यानंतर आता पणन संचालक सतीश सोनी यांनी विठ्ठल क्षीरसागर यांनी सेवाज्येष्ठता व पात्रतेनुसार सचिवपदी नेमणुकीबाबत केलेले अपील व मागण्या मंजूर करीत बाजार समितीने केलेला ठराव व सभापतींचा आदेश रद्द ठरविला आहे . त्यामुळे क्षीरसागर यांच्याकडील सचिवपदाचा पदभार कायम राहिला आहे. याप्रकरणी क्षीरसागर यांच्या वतीने ॲड.अभय इनामदार, पाटणे यांच्याकडून ॲड. तोष्णीवाल, राऊत तर सभापतींच्या वतीने ॲड. सोमण, यांनी काम पाहिले .
............
जगताप गटात आनंदोत्सव
अपिलावरील निर्णयानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवानेते शंभूराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर यांनी क्षीरसागर यांचे अभिनंदन करीत आनंदोत्सव साजरा केला.