पाव्हण्या-रावळ्यांनी केली एकमेकांवर कढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:51+5:302021-01-22T04:20:51+5:30
अक्कलकोट : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये काझीकणबस येथे मामा-भाचा, भावजयी-नणंद तर तडवळमध्ये काका- ...
अक्कलकोट : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये काझीकणबस येथे मामा-भाचा, भावजयी-नणंद तर तडवळमध्ये काका- पुतण्या, जावई- सासरा असा अशी लढत होऊन एकाला पराभव पत्करावा लागला. बासलेगावमध्ये मुंबई येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पराभव केला. यंदाच्या निवडणुकीत अनेक गावांमध्ये पाव्हण्यारावळ्यांनी एकमेकांना पाडापाडी करून विजय मिळवल्याचे दिसून आले.
काझीकणबस म्हटले की, एके काळी मुनाळे, मजगे यांच्या नावाने ओळखले जायचे. दहा वर्षांपूर्वी मुनाळे यांनी एका तरुण युवकाला गावचा विकास करेल या हेतूने आकसापुरे यांना राजकारणात संधी दिले. सलग दोन टर्म सत्ता भोगली. नंतरच्या काळात लोक नाराज झाले. यामुळे यंदा मुनाळे यांनीच ६ जागा जिंकत त्यांचा पराभव केला. म्हणजेच ज्यांनी आणले होते, त्यांनीच घालविले. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली. दत्तात्रय मुनाळे, लताबाई मजगे, सुनिता धर्मसाले, सिद्धाराम धर्मसाले, अनुषया बंदीछोडे, महादेवी मजगे असे मजगे-मुनाळे-धर्मसाळे- बंदीछोडे यांच्या पॅनलचे सहा तर विरोधी पॅनलचे अशपाक आकसापुरे,अमृत कांबळे, महादेवी वाघमारे असे तीन उमेदवार निवडून आले.
तडवळ ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. पारंपरिक राजकारणी सद्दलगी, याबाजी, पनशेट्टी, बनसोडे, मानशेट्टी अशा दिगग्जांनी एकत्रित येऊन पॅनल करून मतदानादिवशी आपणच येणार असे निकाल जाहीर केले होते. त्यांच्या विरुद्ध संजय याबाजी टीमने जोरदार टक्कर देऊन सर्व जागा मोठ्या फरकाने निवडून आणल्या. अशोक रत्नाकर, संजय याबाजी, जयश्री कोरपे, बीबीजान शेख, गौराबाई याबाजी, भीमन्ना गोडयाळ, गौराबाई माळी, निलम्मा बुळळा, मलम्मा गायकवाड, उमेश गायकवाड, संतोष कुंभार.
बासलेगाव येथेसुद्धा दिगग्ज राजकारणी विरुद्ध तरुण युवकांनी जगदंबा ग्रामविकास पॅनल तयार करून ग्रामविकास पॅनलचा दारुण पराभव केला.
मुंबई येथील प्रसिद्ध व्यापारी शांतमल पाटील यांचा गावातील अल्पभूधारक शेतकरी सिद्धाराम बिराजदार यांनी दारुण पराभव केला. त्यामुळे पॅनलप्रमुखमधील त्यांचा भाऊ प्रा. चंद्रकांत पाटील यांना पराभव जिव्हारी लागला आहे. सिद्धाराम बिराजदार, श्रीनिवास गवंडी, दीपा राठोड, शांताबाई सुतार, धोंडिबा गायकवाड, कुलल राठोड, बिरु बंदिछोडे, सीमा स्वामी तर बिनविरोध तिपव्वा सोडडगी निवडून आल्या आहेत.
काझीकणबस येथे वैष्णवी मजगे या नणंदेचा त्यांच्या भावजयी लताबाई मजगे यांनी पराभव केला. सलग २५ वर्षे सत्तेत राहिलेल्या ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय मुनाळे या मामांनी भाचा रामचंद्र गयाळे यांचा पराभव केला आहे. तडवळ येथे संजय याबाजी या काकाने प्रतिस्पर्धी उमेदवार पुतण्या प्रकाश याबाजी यांचा दारुण पराभव केला. कामराज पद्माकर या सासऱ्याने जावई अशोक रत्नाकर यांचा पराभव केला. गौराबाई याबाजी यांनी शशिकला दोड्याळ यांचा केवळ दोन मताने पराभव केल्याने शशिकला यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. सुरेश सद्दलगी या सेवानिवृत्त पोलीस पाटील यांच्या धर्मपत्नीला दोन ठिकाणी उमेदवारी दिली होती. दोन्ही ठिकाणी पराभव झाला. एका ठिकाणी तर अनामत रक्कम जप्त झाली.
फोटो ओळ-२१अक्कलकोट-तडवळ
तडवळ येथे संजय याबाजी पॅनलचे कार्येकर्ते जल्लोष करताना.