पवारांची सेटिंग... विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:16+5:302020-12-22T04:21:16+5:30
पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळावे यासाठी औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी ...
पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळावे यासाठी औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी दावा केला होता. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंढरपूरचा दौरा करून दिवंगत आ. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड होण्यासाठी सेटिंग लावली होती. त्यानुसार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
कारखान्याच्या इतिहासातील ते सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन केले होते. श्री विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावरील सहायक निबंधक एस. एस. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी भगीरथ भालके यांचा एकमेव अर्ज आल्याने एस. एस. तांदळे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर विठ्ठल परिवाराचे कल्याणराव काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
भगीरथ भालके म्हणाले, विठ्ठलच्या संचालकांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला. त्या विश्वासाला पात्र राहून कारखान्याचा कारभार सर्वांना बरोबर घेऊन केला जाईल. सध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. सभासद शेतकऱ्यांच्या नोंदलेल्या सर्व उसाचे गाळप केले जाईल. सभासदांनी आपला सर्व उस गळितास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार, कार्यकारी संचालक आर. एस. बोरावके, बाळासाहेब करपे, विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य डी. आर. पवार, कारखान्याचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे आजी, माजी सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.