सोलापूरमध्ये हायवेवरील डिव्हायडर तोडून लक्झरने धडक दिलेल्या पादचाऱ्याचा मृत्यू
By विलास जळकोटकर | Published: May 30, 2023 05:02 PM2023-05-30T17:02:37+5:302023-05-30T17:02:48+5:30
सोमवारी रात्री १०:३० च्या सुमारास शेळगीजवळील रघोजी ट्रान्सपोर्टजवळील हायवेवर हा अपघात झाला.
सोलापूर : कर्नाटकातून मुंबईकडे सुसाट निघालेल्या लक्झरीचे वेगावर नियंत्रण न राहिल्यानं त्यानं रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक देऊन हायवेवरील डिव्हायडर तोडले. यामध्ये पादचारी अंबादास क्षीरसागर (वय- ५०, धोत्रीकर वस्ती) याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो बेशुद्ध पडला. गंभीर अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री १०:३० च्या सुमारास शेळगीजवळील रघोजी ट्रान्सपोर्टजवळील हायवेवर हा अपघात झाला.
पादचाऱ्याचा मंगळवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला. सोमवारी रात्री साधारण सहाच्या सुमारास कर्नाटकातील शहापूर येथून एम आर ट्रॅव्हल्स खासगी बस मुंबईकडे निघाली होती. ही बस मार्केट यार्डासमोरुन वळण घेत शेळगी जवळील रघोजी ट्रान्सपोर्टसमोरील रोडवर सुसाट धावत होती. याच दरम्यान, अंबादास क्षीरसागर (वय ५०, रा. धोत्रीकर वस्ती, सोलापूर) हे ग्रहस्थ रस्ता ओलांडत होते. नेमक्या त्याचवेळी लक्झरीची धडक बसल्याने अंबादास रस्तावर कोसळले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहिले. हाताला खरचटले. तो पर्यंत बस डिव्हाडर तोडून सर्विस रोडवर आली.
या प्रकारामुळे जमाव संतापला. येथे अनेक दिवसांपासून ब्रीजची मागणी असताना ती पूर्ण होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
जखमी होऊन बेशुद्ध झालेल्या अंबादास क्षीरसागर यांना त्यांचा मित्र लक्ष्मण भास्कर याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तातडीने उपचार सुरु झाले. मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने अंबादास शुद्धीवर आले नाहीत. मंगळवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.