दुचाकीनं धडक दिल्यानं पादचाऱ्याच तोंड फुटले, रस्त्यावर सांडलं रक्त अन् बेशुद्ध झाला
By विलास जळकोटकर | Published: March 25, 2023 03:11 PM2023-03-25T15:11:54+5:302023-03-25T15:12:10+5:30
सिव्हील पोलीस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सोलापूर : घरातून कामानिमित्त दुसऱ्या गावाला चाल निघालेल्या पादचाऱ्याला पाठिमागून वेगानं येणाऱ्या दुचाकीस्वारानं धडक दिली. यामुळे पादचारी खाली पडला अन् त्याचं तोंड फूटून रस्त्यावरच भळाभळा रक्त सांडलं. कपाळही फूटून गंभीर जखम झाली. शुक्रवारच्या संध्याकाळी ७ च्या सुमारास करमाळा तालुक्यातील मोरवड येथे ही घटना घडली.
यातील जखमी आप्पा दत्तू कवाळे (वय- ४५, रा. मोरवड) या व्यक्त घरातून उमरड गावाला कामानिमित्त निघाला होता. अचानक पाठिमागून वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराचा तोल सावरला नाही तो थेट पायी चालत निघालेल्या आप्पा कवाळे याला धडकला. यामुळे पादचारी रस्त्यावरच पडला आणि त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव झाला. कपाळालाही जखम झाली. चेहऱ्याला खरचटल्याने जखम झाली.
लागलीच करमाळा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने मध्यरात्री सोलापूरला शासकीय रुग्णालयात नातलग प्रकाश शेरे यांनी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो बेशुद्धावस्थेत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. येथील सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.