डिजिटल ई-चलनाद्वारे चालकांना ११ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:22 PM2019-05-14T13:22:36+5:302019-05-14T13:24:32+5:30
सोलापूर ग्रामीण पोलीस कारवाई; ग्रामीण पोलीसांकडील ३५ डिव्हायसेस कार्यान्वित
सोलापूर : महाराष्ट्र राज्यात मोटार कायद्याची अंमलबजावणी करताना कारवाईत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ई चलनाद्वारे जिल्ह्यातील वाहनचालकांना ११ लाख १९ हजार ८९0 रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी सांगितले.
महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये ई-चलन प्रमाणे कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. डिव्हायसमध्ये वाहनाचा फोटो काढला जातो. वाहनांचा नंबर व चालकाचा लायसन्स नंबर टाकल्यानंतर संपूर्ण माहिती मिळते. वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी इशारा करूनही न थांबल्यास कारवाई होते. वाहन धारकांकडे दंडात्मक कारवाईची रक्कम नसेल तर ए.टी.एम. कार्डद्वारे भरण्याची सुविधा केली आहे. वाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती पाठवता येते. ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत असेही कुर्री यांनी सांगितले.
दंडाची पावती प्रिंटद्वारे...
- - पूर्वी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे दंडाची पावती देणारे पुस्तक होते, डिजिटल ई चलनाच्या मशिनमुळे कारवाई करणे सोपे झाले आहे. डिव्हायसला छोटा प्रिंटर असून वाहनचालकांना तत्काळ त्याची पावती दिली जाते.
- - जिल्ह्याव्यतिरिक्त मुंबई, पुणे आदी ठिकाणी झालेल्या कारवाईनंतर दंड न भरलेल्या वाहनचालकांकडून या मोहिमेंतर्गत वसुली करण्यात आली आहे.