सोलापूरकरांनो; सहा कोटींचा दंड भरता की थेट कोर्टाची पायरी चढता ?
By Appasaheb.patil | Published: August 5, 2022 12:37 PM2022-08-05T12:37:19+5:302022-08-05T12:37:25+5:30
वाहतूक नियमांचे पालन होईना; वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढला
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्यात शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम लागू केला. यात वाहतूक नियमांना अधिक महत्त्व दिले. वाहतूक नियमांचा भंग करू नये, म्हणूनच जबर दंड आणि वाहन परवाना निलंबन व खटला दाखल करण्याची तरतुदी केल्या आहेत. मात्र, तरीही वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दंड भरता की, खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून कोर्टात खेचू, असा इशारा जिल्हा वाहतूक शाखेने दिला आहे.
आता नागरिकांनाच नियम पाळण्याची सवय करून घेण्याचीच गरज आहे. वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढविला आहे. हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे. परंतु, नियम पाळणे शक्य आहे. जबर दंडामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद वाढत आहे. मात्र, हा दंड सरकारच्या धोरणामुळे वाढलेला आहे. दंड पोलिसांनी वाढविला नाही हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
------------
असा आहे दंड
वाहतूक नियम - वाहनधारक - एकूण दंड (लाखांत)
- - विना हेल्मेट - ९६४३ - ४८, २१,५००
- - विना सिटबेल्ट - १९, ५२७ - ३९,१५,०००
- - वेगमर्यादेचे उल्लघंन - ६७६५ - १,३४,७१,५००
- - वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - १५४४ - १७,३३,५००
- - ट्रिपलशीट - ४०४० - ४०,४०,०००
- - अतिरिक्त प्रवासी वाहतूक संख्या - ४८३७ - १०,७८,६००
- - इतर - ४३,७०९ - २,७४, ७,८००
-----------------
ऑनलाइन नोटिसा
जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यांना ऑनलाइन दंड केला जातो. त्या दंडाबाबत मोबाईलवर संदेशाद्वारे किती रुपयांचा दंड केला त्याबाबत कळविले जाते. त्यानंतर दंड भरण्यासाठी मोबाईलवर किंवा समक्ष पोस्टाद्वारे नोटीस पाठविली जाते. त्यात वाहतूक नियम मोडलेली तारीख, वेळ, स्थळ व एकूण दंडाचा समावेश असतो.
--------
दंड भरा...कारवाई टाळा...
ज्या वाहनधारकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाचा मॅसेज किंवा नोटीस प्राप्त झाली आहे. त्या वाहनधारकांनी त्वरित वाहतूक शाखा, वाहतूक कर्मचारी किंवा ऑनलाइन स्वरूपात भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
----------
वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेळोवेळी दंड आकारण्यात येतो. त्याबाबतचा संदेश व दंड न भरल्यास नोटीसही मोबाईलवर पाठविला जातो. वाहनधारकांनी प्रलंबित दंड भरून वाहतूक नियमांचे पालन करावे.
- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर.
-------------