गावातून घर गाठण्यासाठी या गावातील लोकांना करावा लागतोय होडीतून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:06 PM2020-10-06T13:06:41+5:302020-10-06T13:08:29+5:30
आम्ही अजून किती दिवस होडीतून प्रवास करायचा? वाळूजकरांचा सवाल : नदीवर पूल उभारण्याची मागणी
वाळूज : वाळूज (ता़ मोहोळ) येथे भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे़ मुसळधार पावसामुळे सध्या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत़ गावच्या पूर्वेला सुमारे ५०० नागरिकांची जाधव वस्ती आहे़ त्यामुळे या वस्तीवरील नागरिकांना किरकोळ कामासाठी वाळूजला जावे लागते़ पण सध्या पाणी असल्याने होडीतूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे़ तरी या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाळूज येथे भोगावती व नागझरी नद्यांचा संगम आहे़ शिवाय सध्या देगाव वा़ येथील कोल्हापूर बंधाºयाला दारे टाकल्यामुळे वाळूज -सोलापूर रस्त्यावर १० फूट पाणी आहे. गावाच्या पूर्वेला पाचशे नागरिकांची जाधव वस्ती आहे. तसेच गावांचा निम्मा भाग नदीच्या पलीकडे आहे़ नदीला पाणी आल्यावर तिकडे जायचे कसे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे़ नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी, आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी वाळूज येथे येण्यासाठी कळमण, नरखेडमार्गे ४० कि.मी. अंतर पार करून यावे लागते. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न उपस्थित केला जातो़ संबंधित उमेदवार हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देतो़ नंतर फिरकतच नाहीत़ त्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत़ तरी या नदीवर कायमस्वरूपी पूल उभारावा, अशी मागणी सुभाष जाधव, धनाजी मोटे, तुकाराम कादे, तुकाराम काकडे, जयवंत जाधव, सुभाष कादे यांनी तहसीलदारांकडे केली आहे़
संबंधित होडी चालक याला सुरक्षिततेविषयी समज दिली आहे़ तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना खासगी होडी नदीमध्ये चालू असल्याबाबत कळविले आहे़
- अर्चना कादे,
पोलीस पाटील, वाळूज