जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिपल्स रिपब्लिकन पक्षाची निदर्शने
By संताजी शिंदे | Published: May 31, 2024 07:45 PM2024-05-31T19:45:45+5:302024-05-31T19:47:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केले होते.
सोलापूर : महाड येथे झालेल्या मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केले होते. आंदोलन करत असताना, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून विटंबना केली.
ही बाब आंबेडकरांना मानणाऱ्या करोडो लोकांना आवडलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीच्या अमानवी अनैसर्गीक विचार तत्व म्हणून, मानणाऱ्या मनुच्या ग्रंथातील काही श्लोक शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ठ करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. मनुस्मृती मागासवर्गीय व बहुजन समाजाचे हक्क हिरावून घेणार आहे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येऊ नये अशी मागणी, यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी निदर्शनादरम्यान केली.
यावेळी अनिल सोनकांबळे, अंकुश मडीखांबे, महेश कांबळे, शाहू हत्तेकर, ॲड. लौकीक इंगळे, शारदा वाघमारे, रवी क्षीरसागर, रजाक शेख, मनुद्दीन बागवान, सैफन शेख, गौरव इंगळे, धनंजय निकंबे, नागेश चिलवेरी, दत्तात्रय सर्वगोड, अजय कोकरे, सुरज पाटील, रितेश इंगळे आदी कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.