सांगोल्यातील १०३ गावांत मतदानाचा टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:02 AM2019-04-25T11:02:22+5:302019-04-25T14:00:04+5:30
‘वंचित’मुळे मतविभागणी होण्याचा अंदाज; विकासाऐवजी उणीदुणी काढल्याने मतदारांची होती नाराजी
अरुण लिगाडे
सांगोला : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीतील सांगोला विधानसभा मतदारसंघातील १०३ तर पंढरपूर तालुक्यातील १५ गावांमधून २९६ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदानात एकूण २ लाख ८९ हजार ४१७ मतदारांपैकी १ लाख ८५ हजार ८१८ मतदारांनी हक्क बजावला. ६४.२0 टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा यंदा कमी मतदान झाल्याने टक्का घसरला आहे.
सन २०१४ च्या तुलनेत हा आकडा अल्पसा घसरला असल्याचेही मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गतनिवडणुकीत ६४.५९ टक्के मतदान झाले होते. चालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. असे असले तरीही सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा आहे.
वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा फटका कुणाला बसतो, यावरच सांगोला तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळेल हे निश्चित होईल. वंचित बहुजन आघाडीकडे दलित व मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार व महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यामुळे तालुक्यातील काही धनगर मतदारही वंचित आघाडीकडे वळल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारा आंबेडकरी चळवळीतील व मुस्लीम या पारंपरिक मतदारांनी वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारल्याने माहितीच्या उमेदवाराला त्याचा किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याने काही प्रमाणात तालुक्यातील मतदार नाराज झाला होता. महायुतीचे उमेदवार कर्जबाजारी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून जाहीर सभेतून सांगितले होते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व स्वार्थी असल्याचे महायुतीच्या व्यासपीठावरून बोलले जात होते. प्रचारादरम्यान यंदा सांगोल्याचे पाणी चांगलेच पेटल्याचे दिसून आले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून महायुतीच्या उमेदवाराने राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर या योजनेला महायुतीच्या उमेदवाराचा विरोध असल्याचा प्रचार सोशल मीडियावरून राष्ट्रवादीने केला होता.
पाण्याचे आश्वासक भाष्य
- सांगोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या शेवटच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर आश्वासक भाष्य केल्याने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे सांगोला तालुक्यातील मतदार आपल्या मतांचे पवित्र दान कोणाच्या पारड्यात टाकले, यावरच माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.