चिमुकल्यांच्या पक्षी छावणीत मोरांसंगे चिमण्याही रमल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:23 PM2019-03-07T17:23:02+5:302019-03-07T17:24:21+5:30
विलास मासाळ मंगळवेढा: आधीच पाण्याने त्रस्त असलेल्या दुष्काळी भागात यंदा भीषणता अधिक प्रमाणात वाढली आहे. जिथे मनुष्याला खायला काही ...
विलास मासाळ
मंगळवेढा: आधीच पाण्याने त्रस्त असलेल्या दुष्काळी भागात यंदा भीषणता अधिक प्रमाणात वाढली आहे. जिथे मनुष्याला खायला काही मिळेना तिथे पक्ष्यांकडे कोण पाहणार? अशी स्थिती असताना मंगळवेढा तालुक्यात खुपसंगी गावातील शाळेत शिकणाºया मुलांनी पक्ष्यांची छावणी काढली आहे. या पक्ष्यांना खायला अन्न आणि प्यायला पाणी देऊन या निरागस बालकांच्या चेहºयावरील आनंद अधिक सुखद गारवा देणारा आहे.
खुपसंगी हे गाव सातत्याने पाण्याच्या टँकरवर जगणारं. या गावातील लवटेवस्ती आणि माळी वस्ती येथील शाळेत जाणारी ८ ते १० मुलं. विविध योजनांच्या नावाखाली झालेली वृक्षतोड. ओढा, नाला रुंदीकरणामुळे मोठी झाडे राहिली नाहीत. या भागात असणारे मोर, लांडोर व इतर पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जवळपास संपुष्टात आलेला. या भागातील विहिरी कोरड्या, १००० फुटांच्या खाली पाणीपातळी गेलेली. अगदी अंघोळही अर्ध्या बादलीत करावी लागण्याची स्थिती. सतत पाण्याच्या टँकरची वाट पाहण्यातच जिंदगी गेली असंच खुपसंगीकरांचं जगणं. माणसाची ही अवस्था असताना जनावरे, पक्ष्यांचा टाहो कोण ऐकणार?
या पक्ष्यांची ही स्थिती पाहून राजवर्धन गणपतराव लवटे, यश बाळासाहेब लवटे, दादासाहेब बाळासाहेब लवटे, मनोज सुरेश लवटे, श्रेयस सावबा वाले, सुयश सावबा वाले, ओम मोहन माळी, आदित्य नागप्पा वाले, शिवशंकर नागप्पा वाले या मुलांना आपण काही तरी करावं वाटलं. टँकर आल्यानंतर त्यातील वाचलेलं पाणी एकत्र आणतात. शाळेला जाण्यापूर्वी किंवा जाऊन आल्यानंतर ही मुले घरातील गहू, तांदूळ, ज्वारी, मका, तूर असे जे मिळेल ते धान्य झाडाखाली पक्ष्यांना टाकतात. मिळेल तो आसरा शोधणाºया पक्ष्यांना खाऊ घालण्याची ही धडपड पाहून गणपतराव लवटे, सुचिता लवटे, रामदास चौगुले, भगवान चौगुले यांनी मुलांना प्रोत्साहन दिले.
यापेक्षा आनंद वेगळा तो काय ?
- आमच्या भागातील पक्षी, प्राणी यांना प्यायला पाणी मिळत नाही. त्यांचे हाल होत आहेत, हे पाहून आम्ही सर्व मित्रांनी त्यांना पाणी आणि धान्य देण्याचा निर्णय घेतला. मोर, लांडोर आणि इतर पक्षी या ठिकाणी येतात. आम्ही दिलेले धान्य खातात, पाणी पितात याचा आम्हाला अधिक आनंद मिळतो असे राजवर्धन लवटे याने सांगितले.