चार दिवसांचा अवधी.. सात बिनविरोध..आणखी मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:05+5:302021-01-01T04:16:05+5:30
तालुक्यातील ९४ गावातील ३०९ प्रभागातील ८१३ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. यंदाही विक्रमी ३७३ अर्ज दाखल झाले. तालुक्यातील क्रमांक ...
तालुक्यातील ९४ गावातील ३०९ प्रभागातील ८१३ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. यंदाही विक्रमी ३७३ अर्ज दाखल झाले. तालुक्यातील क्रमांक तीनची ग्रामपंचायत असलेल्या धामणगाव (दु.) येथे सर्वाधिक ६३ अर्ज दाखल झाले. ही सात गावे झाली बिनविरोध उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सात ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये खडकलगाव, भोयरे, मंंगशी आर, पिंपळगाव पान, पिंपळगाव दे., जामगाव पा. व जहानपूरचा समावेश आहे. यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या जामगावची निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे.
गावात सुरू आहेत बिनविरोधच्या चर्चा
बऱ्याच गावात बिनविरोधची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थांचे प्रयत्न सुरू आहेते. त्यामुळे ४ जानेवारीपर्यंत मालवंडी, गौडगाव, झरेगाव, पाथरी, हिंगणी, अरणगाव, कापशी, शेलगाव व्हळे, बाभूळगाव, कांदलगाव, दडशिंगे व सौंदरे ही बारा गावे बिनविरोध होतील अशी चर्चा आहे.
पाच वर्षांपूर्वी अशी होती गटनिहाय सत्ता
मागील वेळेस निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये आ. राजेंद्र राऊत गटाच्या ३१, माजी आ. दिलीप सोपल गटाच्या २२, राजेंद्र मिरगणे गटाच्या दोन, भाऊसाहेब आंधळकर यांची एक, तर सर्वपक्षीय स्थानिक आघाड्यांच्या नऊ, पाच त्रिशंकू आणि स्थानिक आघाड्यांच्या सहा ग्रामपंचायती आल्या होत्या.
या ग्रामपंचायती झाल्या होत्या बिनविरोध
सावरगाव, जामगाव (पा.), कापशी (सा.) आंबेगाव, तांदुळवाडी, पिंपळगाव (दे.), खडकलगाव, गुळपोळी, अरणगाव मळेगाव, शेलगाव व्हळे, इर्लेवाडी, इंदापूर, हिंगणी पा., तुळशीदासनगर व जामगाव आ. अशा एकूण सोळा गावाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या.
मळेगावचे काय होणार?
मळेगावची परंपरा यंदा खंडित होणार की, निवडणूक लागणार याकडे लक्ष लागले आहे. चाळीस वर्षांपासून मळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र यंदा बिनविरोधसाठी बैठका झाल्या. मात्र उमेदवार निश्चितीवरून एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे यंदा दोन्ही गटांनी मिळून ३४ अर्ज दाखल झाले आहेत़