१३ मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:41+5:302021-02-09T04:24:41+5:30
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परमिटरूम, बिअर-बार, बिअर शॉपी व वाईनशॉप बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सगळीकडे ...
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परमिटरूम, बिअर-बार, बिअर शॉपी व वाईनशॉप बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सगळीकडे परमिट रुम बंद होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात काही परमिट रूमधारकांनी जास्त दराने दारू विक्री करून सर्व साठा संपवलेला होता. परत प्रशासनाला साठा देताना अडचण येणार असल्याने व्यवस्थित साठा दाखविण्यासाठी बऱ्याच दारू दुकानदारांनी बनावट दारुचा साठा दाखविल्याची तक्रार व लॉकडाऊनमध्ये दारुविक्री करीत असल्याची तक्रार बशीर जहागीरदार यांनी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व दारुबंदी मंत्रालयाकडे केली होती. त्याची दखल घेत राज्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात संशयित परमिटरुम बिअरबार, बिअर शॉपी यांची पथके नेमून चौकशी केली. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक १३ किरकोळ मद्य विक्रेत्यांनी मद्यविक्री केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचे मद्यविक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बशीर जहागीरदार यांना पत्राद्वारे कळविली आहे.