सोलापुरातील सोनांकुर कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा ; समाजसेवकांनी केले धरणे आंदोलन
By संताजी शिंदे | Published: May 2, 2023 05:34 PM2023-05-02T17:34:10+5:302023-05-02T17:34:39+5:30
जोपर्यंत सोनांकुर कत्तलखाना बंद होत नाही तोपर्यंत गोप्रेमी तीव्र लढा देत राहतील असा इशारा बिराजदार यांनी दिला.
सोलापूर: अवैद्यरित्या चालत असलेल्या सोनंकुर कत्तलखाना कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी समाजसेवक रुद्रप्पा बिराजदार, वैद्य नवनाथ दुधाळ यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्राणी मित्र विलास शहा, हभप पुष्पलता पाटील, महेश भंडारी, केतन शहा, गोपाल सोमाणिया, शांतवीर महेंद्रकर, अनिल पाटील, बी. ए. जाधव, देविदास मिटकरी, अक्षय तोडकरी, विक्रांत बशेट्टी, गणेश घुले, चंद्रप्रभू शहा, सत्यशीला देशमुख, सुनीता बाबर, प्रतिभा एडके, माधुरी डहाळे, बावळे, सुधीर बहिरवडे, डॉक्टर माधुरी पारपल्लीवार व असंख्य पर्यावरण प्रेमी, गोप्रेमी गोरक्षक गोभक्त यांचा सहभाग होता.
सोनंकुर कंपनीच्या कत्तलखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यासाठी व जरूर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र शासन नियुक्त प्राणीक्लेश समिती, कत्तलखाने तपासणी भरारी पथक, महाराष्ट्र शासन नियुक्त उच्च अधिकार समिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मुंबई नियुक्त खास नियुक्त समिती नेमण्यात आली आहे. या तिन्ही समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आहेत. नियुक्ती पत्रामध्ये निर्देश दिलेल्या एकाही कामाची कार्यवाही प्रशासनाकडून होताना दिसत नाही असे निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत सोनांकुर कत्तलखाना बंद होत नाही तोपर्यंत गोप्रेमी तीव्र लढा देत राहतील असा इशारा बिराजदार यांनी दिला.