रेल्वेच्या धडकेतील इसमाची ओळख त्याने घातलेल्या चपलेने पटली
By रूपेश हेळवे | Published: November 4, 2022 04:36 PM2022-11-04T16:36:42+5:302022-11-04T16:37:47+5:30
रुग्णसेवक लादेन याने घटनास्थळी आणलेले चप्पल दाखवल्यानंतर त्यांना मृताची ओळख पटली.
सोलापूर: आसरा पुला जवळ रेल्वे रुळावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका इसम छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. यामुळे त्याची ओळख पटवणे अशक्य झाले होते. दरम्यान, धडकेतील इसमाची ओळख त्यांच्या नातेवाईकांनी घातलेल्या चपलेवरून पटवली. यातगिरी नारायण बासुतकर (वय ५५, रा. दाजी पेठ) असे मयताचे नाव आहे.
बासुतकर हे अक्कलकोट एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये वॉचमन होते. ते शुक्रवारी सकाळी जुळे सोलापूर येथील नातेवाईकांना भेटण्यास जातो असे सांगून ते जुळे सोलापुरातील कल्याण नगर २ येथे आले. त्यांनी तेथील नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांनी भेट दिली. त्यानंतर तेथेच सायकल व मोबाईल ठेवून बाहेर गेले. दरम्यान, काही वेळेने तेथे रुळावर एका इसमाला रेल्वेची धडक बसल्याचे सांगण्यात आले. यामुळे तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली.
पोलीसांनी लगेच घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात त्या इसमाचे शरीराचे तुकडे झाले होते. तसेच चेहराही ओळखता येत नव्हते. पोलिसांनी त्या इसमाला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, संशय आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पहाणी केल्यानंतर ते आपल्याला भेटायला आलेले बासुतकर असल्याचे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी लगेच बासुतकरांच्या पत्नी व मुलाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पत्नी व मुलगा ही रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना ओळख पटेणासे झाले. दरम्यान, रुग्णसेवक लादेन याने घटनास्थळी आणलेले चप्पल दाखवल्यानंतर त्यांना मृताची ओळख पटली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. ही घटना कळताच मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"