‘रासेयो’तून व्यक्तिमत्त्व विकासाला झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:01 AM2019-01-07T11:01:36+5:302019-01-07T11:01:59+5:30
राष्टÑीय सेवा योजनेचा विजय असो...हे सर्व शब्द ऐकले की, आजही ते संगमेश्वर कॉलेजमधील रासेयो दिवस आठवायला लागतात. पदवीच्या शिक्षणाला ...
राष्टÑीय सेवा योजनेचा विजय असो...हे सर्व शब्द ऐकले की, आजही ते संगमेश्वर कॉलेजमधील रासेयो दिवस आठवायला लागतात. पदवीच्या शिक्षणाला असताना रासेयोचा कोर्सही पूर्ण केला. रासेयो हे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक वेगळंच व्यासपीठ उपलब्ध करून देतं. रासेयोमध्ये कोणत्याच गोष्टीचं बंधन नसतं. वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी रासेयोच्या व्यासपीठावर एकत्र येतात. रासेयोमध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. जात, धर्म, स्त्री, पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. रासेयोने आयुष्य कसं जगावं ते मला शिकवलं.
संगमेश्वर कॉलेजमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्याबरोबर रासेयोला देखील प्रवेश घेतला आणि कामाला सुरुवात झाली. समविचारी मित्र भेटले, आम्ही प्रत्येक कार्यक्रम, रॅली, व्यवस्थित पार पाडायचो. त्यामुळे सर आमच्यावर खुश असायचे. मला आठवतं आमची पहिली कॉलेज कॅम्प सिद्धेश्वर मंदिरमध्ये होती. पहिल्यांदा सात दिवस निवासी शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात मी माईकवर आणि लोकांसमोर बोलायला शिकलो तो अजून थांबलोच नाही.
या कॅम्पमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मी किचनची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. रासेयोच्या माध्यमातून विटेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप कार्यक्रम पार पाडले. रासेयोच्या दुसºया वर्षात असताना रासेयोची पूर्ण जबाबदारी आमच्या खांद्यावर होती. या वेळेस मला राष्टÑीय एकात्मता शिबिरासाठी बागलकोट या ठिकाणी जाण्याची आणि महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि दुसºया राज्याची संस्कृती शिकायला मिळाली. त्यामुळे परराज्यातही मित्र निर्माण झाले. परंतु, त्याच दिवसांमध्ये आमचा कॉलेज कॅम्प यत्नाळ या ठिकाणी होता. मी शेवटचे दोन दिवस कॉलेज कॅम्पमध्ये गेलो आणि दोन दिवसात सात दिवसांची भर भरून काढली. सगळे खुश झाले होते.
याच वर्षी कॉलेजची नॅक कमिटीची चाचणी होती. त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ फक्त काम आणि वेगवेगळे कार्यक्रमच घ्यायचो. त्या एका वर्षी आम्ही जवळपास १३० कार्यक्रम घेतले होते. आणि नॅकसमोर प्रेझेंट केले होते. त्यानंतर मला कॉलेजची टीम घेऊन राज्यस्तरीय कॅम्पला जाण्याची संधी मिळाली. तो फार वेगळा अनुभव होता. या कॅम्पमध्ये मी एकपात्री नाटक सादर केलं होतं आणि तेव्हा संपूर्ण गाव रडत होतं. इथेच मी जिंकलो होतो. असे बरेच अनुभव रासेयोमुळे मिळत गेले अणि रासेयोची दोन वर्षे पूर्ण झाली.
रासेयोची दोन वर्षे पूर्ण झाली तरी तिसºया वर्षी मी नवीन स्वयंसेवकांना मदत करत होतो. तेव्हा बनसोडे सरांकडून खूप चांगल्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
गेल्या वर्षी देखील कॉलेज कॅम्प यत्नाळलाच होता. परंतु, यावर्षी देखील राज्यस्तरीय कॅम्पला जायचं होतं. त्यामुळे दोन दिवस लवकर मी कॅम्पमधून बाहेर पडलो. मी जाताना खूप जणांच्या चेहºयावर नाराजी होती, पण नाईलाज होता.
रासेयोने खूप काही दिलं. जिवापाड प्रेम करणारे मित्र दिले. हीच आयुष्याची खरी शिदोरी आहे. आज मला कोणीही विचारलं की, तुला रासेयोने काय दिलं तर मी अभिमानाने सांगेन, ‘माणूस म्हणून जगायला रासेयोने शिकवलं, समाजातील अनेक सामाजिक प्रश्नांची ओळख रासेयोमुळेच झाली, जिवाला जीव देणारे मित्र रासेयोमुळेच भेटले. स्व-ची जाणीव रासेयोमुळेच झाली, व्यक्तिमत्त्व विकासाची संधी रासेयोमुळेच मिळाली, एक उत्कृष्ट मार्गदर्शक विष्णू विटेकर सर रासेयोमुळेच मिळाले, मला हवी तशी आयुष्याची साथीदार रासेयोमुळेच मिळाली. बस्स... आणखी काय हवं. या सगळ्या गोष्टी मला रासेयोमुळेच मिळाल्या म्हणूनच मला म्हणावं वाटतं ‘राष्ट्रीय सेवा योजना’ जीवनाला आकार देणारी अभ्यास प्रणाली आहे.
- विष्णू भोसले
(लेखक समाजकार्य अभ्यासक आहेत)