पेट्रोल, डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:12+5:302021-02-05T06:50:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची दरवाढ वरचेवर होत आहे. महिनाभरात २० वेळा पेट्रोल दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची दरवाढ वरचेवर होत आहे. महिनाभरात २० वेळा पेट्रोल दरात वाढ झाली आहे. पेट्रोल दरात वाढ होत असल्याने पेट्रोल दराबाबत शतक गाठणार, असे वाटत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांचे बजेट मात्र कोलमडले आहे.
गेल्या वर्षी २०१९ मध्ये पेट्रोलचा दर ८० रुपयांच्या आसपास होता. मात्र, २०२० च्या डिसेंबरपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अगोदरच सर्वच बाबतीत दरवाढ होत असल्याने महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे व त्यामुळे जनजीवन चलबिचल झाले आहे. त्यातच आता पेट्रोलच्या दरवाढीने भडका उडविण्याचेच काम केले आहे व ‘जोर का झटकाही जोरसे’च दिला आहे.
आज शेतकरी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळला आहे. बैलजोडीने होणारी मशागत व इतर कामे ट्रॅक्टरद्वारे व इतर यांत्रिक मशिनरींद्वारे केली जात आहेत. या यांत्रिक कामांसाठी डिझेल हे इंधन वापरले जाते. मात्र, डिझेल दरवाढीचा फटका आता शेती उद्योगालाही बसणार असल्याने शेती उद्योग अगोदरच संकटात असताना या संकटात मात्र भर पडणार आहे.
कोट
अगोदरच नैसर्गिक संकटाने शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. यातच डिझेलच्या दरवाढीने शेतीवरही संक्रांत आली आहे. शेतीची कामे करण्यासाठी आधुनिक अवजाराने मशागत केली जाते; परंतु लगेच या कामांच्या दरातही वाढ केली जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
- कैलास पवार, शेतकरी हिवरवाडी.
कोट
आज दुचाकीशिवाय नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जाणे - येणे शक्य होत नाही. त्यासाठी पेट्रोल लागते. मात्र, आता पेट्रोलच्या दरात वरचेवर वाढ होत असल्याने पगाराचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. त्यामुळे सध्या तरी दुचाकीचा वापर मर्यादित स्वरूपात करीत आहे.
- मनोहर मोरे, रोशेवाडी