सोलापुरात पेट्रोलचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर; दररोज सरासरी २० ते ३० पैशांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:48 AM2021-02-15T10:48:01+5:302021-02-15T10:48:07+5:30
९५.११ रुपये लिटर : दररोज सरासरी २० ते ३० पैशांची वाढ, डिझेेलही महागले
सोलापूर : देशभर पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत असताना सोलापूरही मागे राहिलेले नाही. सोलापूर शहरात रविवारी पेट्रोलचा दर ९५.११ रुपये लिटर होता. दररोज पेट्रोलच्या दरात २० ते ३० पैशांनी वाढ होत आहे. या प्रकारेच वाढ होत राहिली तर पेट्रोलचा दर १०० रुपये व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
मागील एका आठवड्याचा विचार केल्यास ९ फेब्रुवारी रोजी ९३.७४ रुपयांवर असणारे पेट्रोल रविवारी ९५.११ रुपयांवर पोहोचले आहे. या सात दिवसांमध्ये १.३७ रुपयांची वाढ झाली आहे. शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने सोलापूरकर खासगी वाहनांचा वापर अधिक करतात. त्यामुळे पेट्रोलचा खर्च अधिक होतो. त्यात नियमितपणे पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने सामान्य नागरिक त्रासला आहे. रिक्षा, बस चालकही वाढत्या दरवाढीला वैतागले आहेत.
करांचा भार असल्याने इंधनदरात वाढ
सामान्य नागरिकांच्या वाहनांत पेट्रोल, डिझेल जाईपर्यंत त्यावर अनेक कर लादले जातात. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होत आहे. उत्पादन शुल्क आणि कृषी अधिभार मिळून पेट्रोलवर सुमारे ३२ रुपये, तर डिझेलवर सुमारे ३१ रुपये शुल्क आकारले जाते. राज्याकडून व्हॅट व रस्ते अधिभार मिळून पेट्रोलवर सुमारे २७ रुपये, तर डिझेलवर सुमारे १७ रुपये कर आकारला जातो. या करात नेहमी बदल होत असतात. याचा परिणाम इंधनाच्या दरवाढीवर होत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. पेट्रोलचे दर वाढत असल्याने त्रासात अधिक भर पडली आहे. मी देगाव येथे राहत असल्याने शिक्षण व कामानिमित्त अनेकदा शहरात फिरावे लागते. यासाठी पेट्रोल खर्च होते. सामान्य माणसावरील भार कमी करण्यासाठी सरकारने इंधनावरील कर कमी करावा.
- राहुल राठोड, नागरिक
आता पेट्रोल शंभरी गाठते की काय, अशी भीती वाटत आहे. कोरोनामुळे आधीच उत्पन कमी झाले आहे. त्यात इंधनदराचा भडका उडत आहे. मध्यंतरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचे वाचले होते. मात्र, तेव्हाही दरात वाढ होत होती, आताही वाढ होतच आहे. या दराला लगाम घालायलाच हवा.
- समद शेख, नागरिक
एका आठवड्यामध्ये शहरातील इंधनाचे दर
दिनांक पेट्रोल डिझेल
- ०८ फेब्रुवारी ९३.४० ८२.६५
- ०९ फेब्रुवारी ९३.७४ ८३.०२
- १० फेब्रुवारी ९४.०२ ८३.२७
- ११ फेब्रुवारी ९४.२६ ८४.५९
- १२ फेब्रुवारी ९४.५४ ८३.९५
- १३ फेब्रुवारी ९४.८३ ८४.३२
- १४ फेब्रुवारी ९५. ११ ८४.६५