पन्नास वर्षांत पहिल्यांदाच यंत्रमाग कामगारांना लागू झाला ‘पीएफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:06 PM2019-11-07T13:06:08+5:302019-11-07T13:09:03+5:30
सोलापुरातील ९७ यंत्रमाग युनिट्सची झाली नोंदणी : ४४५ कामगारांना लाभ
सोलापूर : यंत्रमाग उद्योगाला पन्नास वर्षांचा इतिहास आहे. या पन्नास वर्षांत कामगारांना पहिल्यांदाच भविष्य निर्वाह निधी कायदा लागू झाला. याकरिता येथील क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या आयुक्तांनी कायद्याचा फास आवळला आहे. त्यांच्या कारवाईचा धसका घेत सोलापुरातील बहुतांश यंत्रमाग कारखानदार कामगारांची पीएफ रक्कम भरायला सुरुवात केली आहे. सोलापुरातील ९७ यंत्रमाग युनिट्सची नोंदणी झाली असून, यातील ४४५ यंत्रमाग कामगारांना पीएफ कायद्याचा लाभ मिळत आहे.
यापुढेही आम्ही पीएफ कायद्याच्या अंमलबजावणीकरिता पुढाकार घेणार आहोत़ कारखान्यांची तपासणी सुरू आहे़ कायद्याने पीएफ लागू करणे बंधनकारक असून, जे या कायद्यात येतील त्यांना पीएफ लागू करावाच लागेल, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असे डॉ़ हेमंत तिरपुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यंत्रमाग कामगारांच्या विविध प्रश्नांकरिता सोलापुरात कामगार संघटना आणि मालक संघटना यांच्यात अनेकदा वाद झालेत़ यात पीएफचा महत्त्वाचा प्रश्न होता़ कामगार संघटनांनी अनेकदा रस्त्यावर येऊन आंदोलने केली, मोर्चे काढले, संपही केले, असे असले तरी मागील पन्नास वर्षांत कधी पीएफ कायदा लागू झाला नाही़ तिरपुडे यांनी पीएफ कायदा लागू करण्याकरिता विशेष प्रयत्न केले़
सुरुवातीला त्यांनी यंत्रमाग धारकांना नोटिसा पाठवून पीएफ लागू करण्याची विनंती केली़ तर काही कारखानदारांनी तिरपुडे यांच्या विनंतीला न्यायालयात आव्हान दिले़ न्यायालयात बरेच दिवस सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने देखील कामगारांना पीएफ कायदा लागू करण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशानंतर काही कारखानदारांनी पीएफ लागू केला. येथील ९७ कारखादारांनी कामगारांचा पीएफ भरायला सुरुवात केली़ कामगार संघटनांनी कारखानदारांच्या निर्णयाचे स्वागत केले़ उर्वरित कारखानदारांनी त्वरित पीएफ लागू करावा, अशी मागणी कामगार संघटनांकडून सुरू आहे.
तिरपुडेंचा पाठपुरावा नाही
- यंत्रमाग कामगारांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आदेशानंतर आयुक्तांनी सर्व कारखानदारांना पीएफ लागू करणे बंधनकारक आहे़ त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरू नाही आणि पाठपुरावा करण्याची गरज देखील नाही़ न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो़ सर्व कारखानदारांना पीएफ रक्कम भरणे बंधनकारक असताना अद्याप दहा ते पंधरा टक्केच कारखानदार पीएफ भरत आहेत, हे चुकीचे आहे़ डॉ़ तिरपुडे यांनी याबाबत गांभीर्याने कारवाई करावी़ तो त्यांच्याकडून होईना़ त्यांच्याकडून न्यायालयाचा अवमान होत असल्याची प्रतिक्रिया मनसे यंत्रमाग कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली यांनी दिली.
सोलापुरातील बहुतांश कामगारांना आम्ही पीएफकरिता आवाहन करत आहोत. यंत्रमाग कारखान्यांचे निरीक्षण सुरू आहे. जवळपास एक हजारांहून अधिक युनिट्समध्ये आम्ही पीएफ लागू करणार आहोत. तसेच प्रयत्न सुरू आहेत. काही कारखानदार सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, तर काही कारखान्यांत आम्हाला जनप्रबोधन करावा लागत आहे़ यापुढे आम्ही सर्वच कामगारांना पीएफ मिळावा, याकरिता प्रयत्नशील आहोत.
- डॉ. हेमंत तिरपुडे,
आयुक्त : क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर.
ज्या आस्थापनेत अर्थात कारखान्यात २० किंवा त्यापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार आहेत, अशांना पीएफ कायदा बंधनकारक आहे़ ज्यांच्याकडे वीसपेक्षा कमी कामगार आहेत त्यांना हा कायदा बंधनकारक नाही़ असे कारखानदारही कामगारांना ऐच्छिकतेने पीएफ लागू करू शकतात़
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष : सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर.