पुण्यातील 'त्या' ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:58 AM2020-03-12T11:58:54+5:302020-03-12T11:59:54+5:30
आपत्तीविरोधात यंत्रणा सज्ज : डॉक्टरांच्या पूर्वतयारीसाठी बैठका; मास्क, सॅनिटायझर मूळ किमतीत विकण्याचे आवाहन
सोलापूर : पुण्यातील ‘कोरोनाग्रस्त’टॅक्सीचालक मूळचा सोलापूर जिल्ह्यातील गुरसाळेचा असून, गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या नातेवाईकांना वेगळ्याच त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याचे उघडकीस आले आहे. एका अतिउत्साही कार्यकर्त्याने या रुग्णाच्या फोटो-नावासहित माहिती फेसबुकवर व्हायरल केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही विनाकारण घबराट निर्माण झाली. दरम्यान, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
दुबईहून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याला टॅक्सीतून घेऊन गेल्यानंतर संबंधित टॅक्सीचालकालाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, या सर्वांवर व्यवस्थित उपचार सुरू असतानाच मांजरी येथील एका अतिउत्साही कार्यकर्त्याने फेसबुकवर या टॅक्सीचालकाचा फोटो टाकून त्या खाली कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणून माहितीही अपलोड केली. पाहता पाहता ही पोस्ट व्हायरल होताच संबंधित रुग्णाच्या घराभोवती गर्दी होऊ लागली. या रुग्णाच्या नातेवाईकांनी घराबाहेर पडू नये, अशीही विनंती नागरिक करू लागले. सातत्याने लोकांचे फोन नातेवाईकांना येऊ लागले. शेवटी याला कंटाळून संबंधित रुग्णाच्या भावाने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या वादग्रस्त पोस्टबाबत तक्रार केली. संबंधित पोस्ट काढून टाकण्यात येण्याची मागणीही केली.
कोरोनासारख्या संवेदनशील आजाराच्या बाबतीत रुग्णाची माहिती फोटोसह जगासमोर आणणे, अत्यंत चुकीचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली आहेच; कृपया लोकांनी संयम बाळगून आम्हाला सहकार्य करावे.
टॅक्सी चालकाचा भाऊ, पुणे
मास्कच्या उपलब्धतेचा रोज आढावा
नागरिकांच्या मागणीमुळे शहरामध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मास्क व सॅनिटायझरचा रोज आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी दिली. असोसिएशनतर्फे बुधवारी रात्री पुरवठादारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस ३५ पुरवठादारांची उपस्थिती होती. या बैठकीत पुरवठादार व विक्रेत्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. विके्र त्यांनी चढ्या भावाने मास्क व सॅनिटायझरची विक्री न करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांना मास्क विकताना एमआरपीपेक्षा जास्त किमतीने विकू नका, असे सांगण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांच्या आरोग्य सेवेत कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.