सोलापुरातील चित्र; कोरोना नसलेल्या रुग्णांसह नातेवाईकांचे होताहेत हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:32 PM2020-06-12T14:32:31+5:302020-06-12T14:34:25+5:30
सिव्हिलमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता; खासगी रुग्णालयात नाकारला जातोय प्रवेश
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. यामुळे कोरोना नसलेल्या इतर रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले जात आहे. खासगी रुग्णालयातही त्यांना दाद मिळत नसल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.
कोरोना आजाराची सुरुवात झाल्यापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या आयसोलेशन वॉर्डामध्ये व्हेंटिलेटरची गरज असल्याने तिथे तशी व्यवस्था करण्यात आली आहे. याचा परिणाम कोरोना नसलेल्या वॉर्डात होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉक येथे इतर आजारांवर उपचार करण्यात येतात. तीन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या रुग्णाला कोरोना नसल्याचे स्पष्ट होताच त्याला बी ब्लॉकमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर आता बी ब्लॉकमध्ये व्हेंटिलेटर कमी आहेत. तुमच्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज पडू शकते, त्यामुळे तुम्ही खासगी रुग्णालयात जा, असा सल्ला देण्यात येत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.
स्त्रीरोग विभागात गर्भवती स्त्रियांवर उपचार करून प्रसूती करण्यात येत आहे. हा विभाग पूर्ण क्षमतेने काम करत आहे, तर कोरोना वगळता इतर आजारांकडे रुग्णालयाचे दुर्लक्ष होत आहे. फक्त अतिदक्षता घ्याव्या लागणाºया रुग्णाकडे लक्ष देण्यात येत असून, त्यांनाच अॅडमिट करून घेतले जात आहे. ज्यांच्यावर त्वरित उपचार करण्याची गरज नाही, अशा रुग्णांना तात्पुरते औषध देऊन घरी जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्रास अधिक वाढल्यास रुग्णालयास पुन्हा येण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.
शासनाकडे ५० व्हेंटिलेटरची मागणी
- सिव्हिल हॉस्पिटलच्या ए (आयसोलेशन वॉर्ड) वॉर्डामध्ये २० व्हेंटिलेटर आहेत, तर बी ब्लॉकमध्ये १३ व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांची संख्या जास्त असल्याने सिव्हिलमध्ये असलेल्या व्हेंटिलेटरची संख्या कमी पडत आहे. विषारी साप चावल्याने दाखल केलेल्या एका रुग्णावर व्हेंटिलेटर लावून उपचार करण्यात आले. तो आता ठीक आहे. भविष्यात आणखी व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. यासाठी शासनाकडे ५० व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने माझ्या नातेवाईकाला सिव्हिलमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना कोरोना नसतानाही या अडचणी येत आहेत. मागील दोन दिवसांपासून शहरातील लहान-मोठे दवाखाने शोधत आहे. प्रत्येक रुग्णालय उपचारासाठी नकार देत आहे. सिव्हिलमधून सोडलेल्या रुग्णाला आम्ही घेतच नाही, असे काही रुग्णालयांनी सांगितले. शहरात फक्त कोरोनाच नव्हे तर इतर आजारांचे रुग्णही आहेत, याचे भान रुग्णालयांना नाही.
- रुग्णाचे नातेवाईक