लसीकरण करताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:03+5:302021-02-05T06:49:03+5:30
संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या राजश्री ताड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कोरोनामुळे ...
संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या राजश्री ताड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पोलिओ लसीकरणाची मोहीम रविवारी सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये लसीकरणाची सोय केली होती. रविवारी सकाळी भाळवणी येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देण्यासाठी भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. वैद्यकीय केंद्रातील एक महिला लांबूनच बाळाच्या तोंडात लस टाकत होती. बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत असताना हलगर्जीपणामुळे लसीबरोबरच ड्रॉपचे टोपणही (प्लास्टिकचा लहान तुकडा) बाळाच्या तोंडात गेले. हा प्रकार वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्यासमोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर माधुरी बुरांडे यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्त्या राजश्री ताड यांना सांगितली.
ताड यांनी बाळाला घेऊन उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोट ::::::::::::::::::
संबंधित कर्मचारी पोलिओ पाजण्याचे काम करत होते. अनावधानाने हा प्रकार घडला आहे. बाळ सुरक्षित आहे. त्याला कोणतीही इजा होणार नाही.
- डॉ. एकनाथ बोधले, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंढरपूर