तीर्थक्षेत्रांप्रमाणे अक्कलकोट नगरपालिकेला यात्रा अनुदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:15 PM2018-06-28T16:15:05+5:302018-06-28T16:18:16+5:30
नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्या पाठपुराव्याला यश : तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा विषय पहिल्यांदाच मंत्रिमंडळात
अक्कलकोट : श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरपरिषदेस राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे यात्रा कर लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या कामी नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मंजूर करण्यात आलेला आहे.
श्रीक्षेत्र अक्कलकोट ही श्री स्वामी समर्थ महाराजांची पावन पुण्यनगरी मात्र तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित असलेल्या या शहरातील लोकसंख्या पाहता त्या पद्धतीने समतोल विकास होणे काळाची गरज आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये आठवड्याचा गुरुवार, सलग सुट्ट्या, संकष्टी, पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, श्री प्रकट दिन, पुण्यतिथी सोहळा, विविध उत्सवाच्या काळात प्रचंड गर्दी होत असते. नगरपरिषद ही ब वर्ग असून खर्चाची मर्यादेमुळे योग्य त्या सुविधा उत्सवाच्या काळात देऊ शकत नाही. याबाबत नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मंजुषा म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कर लागू करण्याची मागणी केलेल्या होत्या. याबरोबरच मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.
राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. परंतु यामध्ये श्रीक्षेत्र अक्कलकोटचा समावेश नव्हता, मात्र नगराध्यक्षा शोभा खेडगी व त्यांच्या टीमने याकामी हा विषय राज्य सरकारकडे लावून धरल्याने मंत्रिमंडळाकडून खास मान्यता देण्यात आलेली आहे.
श्रीक्षेत्र अक्कलकोटनजीक असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूर यांना राज्य सरकारकडून यात्रा अनुदान देण्यात येते. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे अक्कलकोट शहरातून स्वागत करण्यात येत आहे. यात्रा अनुदानास मंजुरी मिळाली, मात्र आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी मिळण्यासाठी शिखर समितीची बैठक होणे गरजेचे आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत !
४श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, राज्यातल्या टॉप फाईव्हमधील तीर्थक्षेत्र असताना याकडे दुर्लक्ष झाले. मात्र राज्यातल्या भारतीय जनता पक्षाकडून तीर्थक्षेत्र अक्कलकोटला झुकते माप मिळाले आहे. गेल्या चौदा महिन्यात विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असल्याने गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागण्यास मदत होत आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत! श्रीक्षेत्र अक्कलकोट वासीयांच्या वतीने ऋण व्यक्त करीत असल्याचे मत अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी व्यक्त केले़