पथदर्शी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:46 AM2019-05-09T10:46:40+5:302019-05-09T10:47:36+5:30
दिनविशेष...- कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी केली रयत शिक्षण संस्थेची स्थापना
आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये काले, ता. कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. चालू वर्ष हे संस्थेचे शताब्दी वर्ष आहे.
या शतकात महाराष्टÑाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात रयत शिक्षण संस्थेने अत्यंत भरीव असे योगदान दिलेले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा स्वाभिमान जागृत करणे, जातीविरहित समाज निर्मिती, विद्यार्थी आणि समाजात श्रमप्रतिष्ठेचा मूलमंत्र रुजविणे हीच खरी कर्मवीर अण्णांच्या कार्याची दिशा होती. याशिवाय अण्णांनी एक अतिशय व्यवहारिक विचार प्रत्यक्ष कृतीत आणला तो म्हणजे, समाजात सर्वार्थाने स्वावलंबन साध्य करावयाचे असेल तर शिक्षण, शेती व ग्रामीण विकास या परस्परपूरक बाबींच्या एकत्रित विकासाचा विचार होय.
दुर्गम खेडोपाड्यात, वाड्यावस्त्यांवर, अति मागास भागात सर्व जाती-धर्माच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व शाळा स्थापन करण्यासाठी अण्णांनी महाराष्टÑभर पायपीट केली. त्या काळात त्या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे दैन्य त्यांनी जवळून पाहिले होते म्हणून शिक्षण प्रसाराबरोबरच ग्रामीण रयतेला आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या सल्ल्याने व सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने अण्णांनी जमिनी खंडाने मिळविल्या. देवापूर, हिंगणी, पळसवडे या राजेवाडी तलावाच्या पंचक्रोशीतील शेतकºयांना एकत्रित करून १९५२ मध्ये ‘सहकारी शेती संस्था’ स्थापन केली. सभासद शेतकºयांच्या जीवनात खºया अर्थाने आर्थिक परिवर्तन झाले.
देवापूर गावाने तर त्या साली सरकारला सर्वाधिक लेव्ही दिल्यामुळे गावाला १० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. १९५३ मध्ये जॉन मथाई (भारताचे माजी अर्थमंत्री) यांनी या सहकारी शेतीच्या प्रयोगाला आवर्जून भेट देऊन कर्मवीरांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पुढे टाटा ट्रस्टच्या ‘रुरल डेव्हलपमेंट बोर्डा’ने कर्मवीर भाऊरावांच्या सहकार्याने त्याच परिसरातील देवापूर, गंगोती, हिंगणी, जांभुळणी, पानवन, पुळकोटी, पळसवडे, शिरताव व वळई या नऊ गावांच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार केला व या गावात शेती व ग्रामीण विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या.
हे अण्णांचे कार्य पाहून ग्वाल्हेरच्या जिवाजीराव शिंदे यांनी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, जामगाव, कर्जत, कोळपेवाडी, प्रवरानगर इ. ठिकाणची शेकडो एकर जमीन अण्णांच्या झोळीत दान म्हणून टाकली. पुढे सांगली जिल्ह्यातील आष्टा, कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी अशा महाराष्टÑातील अनेक ठिकाणी अनेक दानशूरांनी अण्णांना जमिनी दान केल्या. अण्णांनी त्या-त्या परिसरातील शेतकरी, संस्थेच्या शाखेतील विद्यार्थी व रयत सेवकांच्या सहाय्याने या जमिनीची मशागत करून अनेक ठिकाणी फळबागा फुलविल्या. शाळा व महाविद्यालयांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून दिले.
शाहू महाराजांनी रुकडी येथील दान म्हणून अण्णांना दिलेल्या १०१ एकर जमिनीवर सध्या संस्थेने पायलट प्रोजेक्ट म्हणून फळबाग प्रकल्प साकारलेला आहे. ‘शेतकºयांची प्रतिष्ठा वाढली तर देशाची प्रतिष्ठा वाढेल’ हे खरे तर या पाठीमागचे अण्णांचे तत्त्वज्ञान होते. सध्या महाराष्टÑातील दुष्काळी भागाची अवस्था अतिशय चिंताजनक अशी आहे. शेतकरी आणि युकांचे आत्मबळ वाढविण्याचे काम कर्मवीरांनी केले. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झिजविले. ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसले. त्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव अण्णांचे शेती विकासाचे प्रयोग महाराष्टÑाला निश्चितच पथदर्शी ठरतील.
- प्रा. उत्तमराव हुंडेकर
(लेखक हे सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष आहेत)