पाईपचा भाव वाढला शेतीला ठिबक कसं करायचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:39+5:302020-12-15T04:38:39+5:30
करकंब : मागील तीन महिन्यांपासून शेतीच्या सिंचन व्यवस्थेचा प्रमुख स्तंभ असलेल्या पीव्हीसी पाइपचे ४० टक्क्यांनी तर ठिबक साहित्याचे १५ ...
करकंब : मागील तीन महिन्यांपासून शेतीच्या सिंचन व्यवस्थेचा प्रमुख स्तंभ असलेल्या पीव्हीसी पाइपचे ४० टक्क्यांनी तर ठिबक साहित्याचे १५ टक्क्यांनी दर वाढले आहेत. त्यामुळे आता शेतीला ठिबक कसे करायचे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. परिणामी पाणी बचतीच्या सिंचन व्यवस्थेला खो बसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
मागील दहा महिन्यांपासून कोरोनाच्या उभ्या ठाकलेल्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागला. अशातच मागील दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी दिलासादायक पाऊस झाला असतानाच परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
एका बाजूला शेतकरी कोरोनाच्या संकटातून सावरतो न सावरतो तोच परतीच्या पावसाचा हाहाकार आणि अशातच सिंचन साहित्याचे दर गगनाला भिडल्याने सिंचन साहित्य खरेदी करून शेती करणे आवाक्याबाहेर गेले आहे. यामधून सावरण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे.
ठिबकच्या अनुदानाची शक्यता धूसर
शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करीत आहे. मात्र २०२० साल अखेरीस आले तरी अद्याप ठिबक अनुदानासाठी पूर्वसंमती घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले नसल्याने ठिबकला अनुदान मिळण्याची शक्यता धूसर झाली असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
शेतकरी सापडला संकटात
मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे, तर परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाणी मुबलक असूनही शेतीच्या सिंचनासाठी लागणारे पीव्हीसी पाइपचे भाव तीन महिन्यात ४० ते ४२ टक्के तर ठिबक साहित्याचे भाव १५ टक्के एवढे उच्चांकी वाढल्याने साहित्य खरेदी करून शेती पिकविणे अशक्य झाले आहे.
आंतराष्ट्रीय पातळीवर कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. सिंचन साहित्याचे वाढलेले दर कशा पद्धतीने कमी करता येतील, यासाठी त्वरित प्रयत्न करू.
- दादाजी भुसे
कृषिमंत्री
कच्चा माल जास्तीच्या भावाने विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे पीव्हीसी पाइप आणि इतर साहित्याचे भाव उच्चांकी वाढले आहेत. शेतकऱ्यांना साहित्य खरेदी करणे अवघड झाले आहे. याची शासनस्तरावर दखल घेणे गरजेचे आहे.
- उज्ज्वल कोठारी
कार्यकारी संचालक, कोठारी पाइप
पावसाळा चांगला झाला आहे
- अभिजित पाटील
शेतकरी, नेमतवाडी