खूनप्रकरणातील आरोपी पोलीसच निघाला पिस्तूलचोर, ३१ पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:14 AM2017-08-20T02:14:26+5:302017-08-20T02:14:29+5:30
पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत.
मंगळवेढा (जि. सोलापूर) : पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान, परवानाधारकांकडून ६८ शस्त्रे जमा केली होती. त्यामध्ये ५० बंदुका, १५ रिव्हॉल्व्हर व ३ पिस्तुली होत्या. यामधील दोन पिस्तुली सात महिन्यांपूर्वी पोलीस कस्टडीतून गायब झाल्या होत्या. पिस्तूलधारक अनिल गायकवाड व नवीनकुमार विग यांनी पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली होती. सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर १६ आॅगस्ट रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या पथकाने शुक्रवारी दुपारी दत्तात्रय भोसले याच्या पोलीस लाइनमध्ये असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या वेळी किचनवरील माळ्यावर दोन फूट लांबीचे काळ्या रंगाचे पिस्तूल मिळून आले. याबाबत भोसले यांच्या पत्नीकडे विचारणा केली असता, मिलिट्रीमधील नातेवाईकांचे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दुसºया खोलीची झडती घेतली असता, धान्याच्या पेटीत बंद पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये दोन शस्त्रे मिळून आली. दोन पिस्तुलांचा तपास सुरू असताना, तिसरे पिस्तूल मिळून आल्याने, तपास पथकाला आश्चर्याचा धक्का बसला.
३१ पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास
पोलीस ठाण्यातील लॉकअप गार्डमधून पिस्तूल चोरीस गेल्यामुळे, त्या दिवशी कर्तव्यावर असणाºया पोलीस अधिकाºयाबरोबर ३१ पोलीस कर्मचाºयांना चौकशीला सामोरे जाण्याची वेळ आली होती. निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडून कारवाई होईल, याची बºयाच पोलीस कर्मचाºयांनी धास्ती घेतली होती. अखेर या पिस्तूलचोरी प्रकरणाचा उलगडा झाल्याने, ‘त्या’ ३१ पोलीस कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.