सोलापूर शहरासाठी एकरुख तलावात पाणी सोडण्याची योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:09 AM2020-01-29T10:09:43+5:302020-01-29T10:10:55+5:30
नियामक मंडळाची मान्यता; आवश्यक निधीची जबाबदारी महानगरपालिकेवर
सोलापूर: सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या मार्डी उजव्या वितरिकेतून एकरुख तलावात पाणी सोडण्याच्या योजनेला नियामक मंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. या कामासाठी येणारा खर्च महानगरपालिका, सीएसआर फंड किंवा जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्याची अट घातली आहे.
सध्या सोलापूर शहराला उजनी धरणातून थेट पाईपलाईन व धरणातून भीमा नदीतून औज बंधाºयापर्यंत पाणी सोडले जाते. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी २३२ किलोमीटर अंतर कापून औज बंधाºयात येते. हे अंतर कापत असताना धरणातून औज बंधाºयात दोन टीएमसी पाणीसाठा करण्यासाठी ७ टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडावे लागते. याशिवाय हे पाणी पुन्हा मोटारीने उचलून सोलापूरपर्यंत येते. यापेक्षा पाणी बचतीसाठी दुसरा मार्ग म्हणून शिरापूर उपसा सिंचन योजनेतून एकरुख तलावात पाणी सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे ८ आॅगस्ट २०१९ रोजी सादर झाला होता. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे ढोबळ अंदाजपत्रक करुन प्रस्ताव शासनाला पाठविला होता.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गेलेल्या या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करेपर्यंत विधानसभा निवडणुका सुरू झाल्या. आचारसंहितेअगोदर हा प्रस्ताव शासनाकडे गेला, मात्र नियामक मंडळाची मान्यता नसल्याने परत आला होता. मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळ बैठकीत जलसंपदा प्रधान सचिव इकबाल चहल, सचिव (लाभक्षेत्र) आर. आर. पवार, कार्यकारी संचालक खलिल अन्सारी, मुख्य अभियंता विलास रजपूत आदी उपस्थित होते.
आता महानगरपालिकेने या कामासाठी स्वत:च्या निधीतून किंवा सीएसआर निधी किंवा जिल्हा नियोजनमधून ९ कोटी रुपयांची तयारी दर्शवली तर शासन या कामाला मंजुरी देणार आहे.
दीड किलोमीटर पाईपलाईन...
- - शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या ७ किलोमीटरपासून मार्डी वितरिकेतून साधारण १२०० मि.मी. व्यासाच्या १५६० अंतराच्या दोन रांगा बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येतील. ७ व्या किलोमीटरपासून हे पाणी मार्कंडेय ओढ्याजवळ येईल.
- - यामुळे सध्याचे उजनी धरणातून औज बंधाºयापर्यंत २३२ किलोमीटरऐवजी बोगद्यातून शिरापूर बंधाºयापर्यंत ८५ किलोमीटर एवढेच अंतर पाण्याला कापावे लागणार आहे.
- - याशिवाय सध्या भीमा नदीतून सोडलेले पाणी महाराष्टÑातील शेतकºयांपेक्षा कर्नाटकच्या शेतकºयांसाठी फारच फायद्याचे ठरत आहे ते नव्या योजनेमुळे होणार नाही. झाला तर सीना नदीकाठच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनाच फायदा होईल.
शिरापूर उपसा सिंचन योजनेतून सोलापूर शहरासाठी एकरुख तलावातून पाणी योजना राबवली तर महानगरपालिकेचा पैसा व धरणातील पाणी वाचणार आहे. महानगरपालिका निधीची जबाबदारी घेतल्यानंतरच प्रत्यक्षात अंदाजपत्रक तयार केले जाईल.
- रमेश वाडकर
कार्यकारी अभियंता, उजनी कालवा क्र.८