पुराच्या घाण पाण्याने सोलापूर जिल्ह्यातील २१९ गावांच्या योजना पडल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:24 PM2020-10-23T13:24:52+5:302020-10-23T13:27:40+5:30
विहिरी स्वच्छ करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी; पिण्यासाठी फिल्टर पाण्याचा पुरवठा
सोलापूर : भीमा व सीना नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील २१९ पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने २५६ गावे बाधित झाली आहेत. नद्यांमध्ये असलेल्या विहिरींमध्ये घाण साचल्यामुळे स्वच्छता करण्यात येत असून, बाधित गावांतील लोकांना ग्रामपंचायतीमार्फत फिल्टर पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतींसाठी १०८७ पाणीपुरवठा योजना आहेत. भीमा, सीना व बोरी नद्यांना आलेल्या पुरामुळे २१९ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजनांसाठी नदीमध्ये विहिरी घेण्यात आल्या आहेत. या विहिरीत पुराचे घाण पाणी, माती, कचरा घुसला आहे. तसेच विहिरीचे पंप, वायरी, वीज कनेक्शनचे साहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. ग्रामपंचायतस्तरावर खासगी ठिकाणचे फिल्टरचे पाणी पुरविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या योजना दुरुस्तीसाठी ५ कोटी ८२ लाख ४५ हजारांची जिल्हाधिकाºयांकडे मागणी करण्यात आली आहे.
ही सुरू उपाययोजना
सद्यस्थितीत पुराचे पाणी ओसरलेल्या ठिकाणच्या विहिरी स्वच्छ करून टीसीएल पावडरने धुऊन घेण्यात आल्या आहेत. पाणी स्वच्छ झाल्याची खातरजमा करून पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. तातडीच्या उपाययोजनेसाठी हातपंप दुरूस्त करण्यात येत आहेत.
अशा बंद पडल्या योजना
तालुकानिहाय बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुढीलप्रमाणे आहेत. माळशिरस: २६, बार्शी: १६, सांगोला: ९, मोहोळ: १८, अक्कलकोट: ५३, उत्तर सोलापूर: ७, दक्षिण सोलापूर: १२, पंढरपूर: ३८, मंगळवेढा: ११ माढा: २०, करमाळा: ९ तसेच जिल्ह्यात १२ हजार हातपंप आहेत, त्यातील ९ हजार सुरू आहेत. अडीच हजार हातपंपांची दुरूस्ती हाती घेण्यात आली आहे.
अतिवृष्टी व पुराने पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतींना पयार्यी व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध केले जात आहे.
-चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी