सासरला चाललेल्या मुलीच्या नावाने लावा रोप
By शीतलकुमार कांबळे | Published: July 3, 2023 04:28 PM2023-07-03T16:28:17+5:302023-07-03T16:28:47+5:30
चार ठिकाणी रानमळा स्मृती वन : वन विभाग करणार संगोपन.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : वन विभागाच्या वतीने रामनळा स्मृती वन साकारण्यात येणार आहे. या अंतर्गत एखाद्या गावातील मुलगी सासरला जात असल्यास तिच्या आठवणीसाठी तिच्या नावाने माहेरी एक रोप लावण्यात येणार आहे. या रोपाचे संगोपन वन विभाग करणार आहे.
घरी बाळ जन्माला आले. त्या बाळाच्या जन्माचं स्वागत फळझाडाचं रोपटं लाऊन करायचे. घरी मंगलकार्य असल्यास रोप देऊन वधु-वराला आशीर्वाद देत मुलींच्या नावाने माहेरात रोप लावायचे. एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या नावे रोप लावायचे. त्या रोपट्याशी आणि ते रोपं देणाऱ्याशी आपलं एक जिव्हाळयाचं नातं निर्माण होतं. ते रोपं मरू नये, जगावं, जोमानं वाढावं म्हणून त्याची काळजी घ्यायची. या पद्धतीने रामनळा स्मृतीवन साकारण्यात येणार आहे.
जिल्ह्या चार ठिकाणी रानमळा स्मृती वन
यंदाच्या पावसाळ्यात रानमळा स्मृती वन साकारण्यात येणार आहे. वन विभागाच्या जागेमध्ये हे वन विकसित करण्यात येणार आहे. यात श्री सिद्धेश्वर वन विहार सोलापूर, मंगळवेढा, नातेपुते, बार्शी या चार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास यात अजून वाढू शकते.