खिलाडू वृत्तीने लढलो; पण प्रचारात गांभीर्य नव्हते याचे दु:ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:57 AM2019-10-23T11:57:45+5:302019-10-23T11:59:44+5:30
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ; चुरस वाढल्याने अटीतटीची झाली लढत
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. सर्वच उमेदवार खिलाडू वृत्तीने लढले; पण प्रचारात गांभीर्य नव्हते. रोजगार, उद्योग या विषयांवर पुरेशी चर्चा अपेक्षित होती, असे मत या मतदारसंघातील प्रमुख पाच उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
एकंदरीत या निवडणुकीत काही लोकांमध्ये गांभीर्य दिसले नाही. कारण प्रचारात ठोस मुद्दे असायला हवे असतात. निवडणूक लढविण्यापूर्वी मतदारसंघाची बांधणी करावी लागते. सतत लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. केवळ शहर मध्य नव्हे तर राज्यातील अनेक मतदारसंघात लोक इकडून तिकडे उड्या मारताना दिसले. निवडणूक म्हणजे चेष्टा-मस्करीचा विषय झाला. मतदारांकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडून बळ मिळाले म्हणायला हरकत नाही. जनतेने मला माझ्या कामाची जाणीव करून दिली.
- प्रणिती शिंदे, उमेदवार, काँग्रेस
लोकांना विकास हवाय, हे पुन्हा दिसले. शिवसेना-भाजपबद्दल लोकांना विश्वास वाटला. माझ्या प्रचारात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून साथ दिली. नव्याने काही लोक जोडले गेले. प्रचारात रोजगार, उद्योग, शिक्षण असे मुद्दे आले. आमची मुले शिकली आहेत. त्यांना रोजगारासाठी पुण्याला, मुंबईला जावं लागतंय. इथे काहीतरी व्हायला हवे, असे सांगणारे अनेक लोक भेटले. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही निवडणूक खूप वेगळी ठरली.
- दिलीप माने, उमेदवार, शिवसेना
अपक्ष म्हणून लढल्यामुळे यंत्रणा उभारताना त्रास झाला. पक्षाच्या उमेदवाराला यंत्रणा सहज मिळते. मला नव्याने बुथबांधणी करावी लागली. काही भागात मी पोहोचू शकलो नाही. पण माझा पूर्व भाग माझ्यासोबत राहिला. सोलापुरात आयटी पार्क करणार, शहराला दररोज पाणीपुरवठा करणार, विडी उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांना पर्यायी रोजगार मिळवून देणार या तीन मुद्यांवर मी प्रचार केला. रोजगाराचा मुद्दा नंतर सर्वच लोकांच्या प्रचारात दिसला. मला लोकांची सहानुभूती दिसली.
- महेश कोठे, अपक्ष उमेदवार
या मतदार संघात मी पहिल्यांदा लढलो. लोकांनी मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. सर्व समाजातील लोक आम्हाला भेटले. सर्वांना जाणून घेता आले. त्यामुळे निवडणुकीनंतर मला एक आत्मविश्वास मिळाला. ही निवडणूक सर्वच उमेदवारांनी खिलाडू वृत्तीने लढली. कुणीही एकमेकांवर आक्षेपार्ह टीका केली नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेतली. याच पद्धतीने निवडणुका व्हायला हव्यात.
- फारुक शाब्दी
उमेदवार, एमआयएम.
ही माझी ११ वी निवडणूक आहे. १९७८, त्यानंतर १९९५ आणि २००४ साली मी निवडून आलो. निवडणुकीचा प्रचार हा कार्यक्रमावर, जाहीरनाम्यावर आणि लोकांच्या प्रश्नांवर व्हायला हवा; पण या निवडणुकीत धर्माची चर्चा झाली. कामाऐवजी जातीची चर्चा झाली, याची खंत आहे. शहर मध्य मतदारसंघात आता हद्दवाढ भागही जोडला गेला आहे. त्यात रस्ते, पाणी आणि ड्रेनेजचे प्रश्न आहेत. यावर फार चर्चा झाली नाही. या मुद्द्यांऐवजी नोटांवर इलेक्शन झाले. हे लोकशाहीला घातक आहे.
- नरसय्या आडम
उमेदवार, माकप