सुखद धक्का... धोक्यातून कमबॅक, १०५ गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:48+5:302021-07-30T04:23:48+5:30
बार्शी : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसलेल्या बार्शी तालुक्यात सध्या ...
बार्शी : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसलेल्या बार्शी तालुक्यात सध्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असतानाच भयभीत झालेल्या या तालुक्यातील गावांनी प्रशासकांच्या नियमांचे पालन केले. यामुळेच तालुक्यातील १०५ गावे कोरोनामुक्त झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी स्पष्ट केले.
आता बार्शी तालुक्यातील फक्त ३४ गावे कोरोनामुक्त व्हायची राहिली असली तरी या गावांत चारच्या आतच रुग्णसंख्या आहे. संपूर्ण तालुका वेगाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे आघाडीवर असलेल्या बार्शी तालुक्याने कमबॅक करीत ही १०५ गावे कोरोनामुक्त केली आहेत.
तालुक्यात एप्रिल-मे महिन्यात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. केवळ एकमेव चिंचखोपण गाव अपवाद होते. सध्या बार्शी तालुक्यातील १३९ गावांपैकी १०५ गावे कोरोनामुक्त होऊन उर्वरित ३४ गावांत शून्य ते चार रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. या काळात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वैरागमध्ये सापडले. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर तरुणांसाठी लसीकरण सुरू आहे. मात्र, लसींचा मागणी तसा पुरवठा होत नाही. त्यामुळे वेगवान लसीकरण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तालुक्यात शंभरहून अधिक रुग्ण सापडणाऱ्या गावांमध्ये खामगाव, बावी, पांगरी, ज्योतिबाची वाडी, भालगाव, सासुरे, मालवंडी, सुर्डी, खांडवी, धामणगाव (दु), बेलगाव, (आर) गौडगाव, पांगरी, पानगाव, बोरगाव (झाडी), उपळे (दु), चिखर्डे, आगळगाव, पिंपळगाव (धस) या गावांचा समावेश आहे. मात्र, आता या गावांनी प्रशासनाच्या नियमांनुसार योग्य ती काळजी घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
कोरोनाचे घटत असलेले प्रमाण तालुक्याच्या आरोग्यासाठी आनंद देणारी बातमी असली तरी काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे, असे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या ३४ गावांत नगण्य रुग्ण
गोरमाळे, बोरगाव (खु), पानगाव, शेंद्री, मालेगाव, बावी, नांदणी, वैराग, चिखर्डे, कळंबवाडी (आ), जामगाव (आ), उपळे (दु), साकत, गौडगाव, दहिटणे, लाडोळे, मालेगाव, चिंचोली ,पांगरी ,पिंपळवाडी, जहानपूर ,बाभूळगाव, चुंब, गाताचीवाडी, मांडेगाव, पिंपळगाव (धस), कळंबवाडी पा., सौंदरे, कव्हे, उपळाई (ठोंगे ), संगमनेर , गुळपळी, सुर्डी, सावरगाव येथे १ ते ४ असे नगण्य रुग्ण आहेत. यासाठी उपलब्ध लसीचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सासुरेचे सरपंच तात्यासाहेब करंडे यांनी व्यक्त केली.
-----
तिसऱ्या लाटेची चर्चा पाहता सध्या कोरोना गेल्याच्या आविर्भावात राहणे धोकादायक असल्याने प्रत्येकांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे व लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. अशोक ढगे, तालुका वैद्यकीय अधिकारी
----