मनाची प्रसन्नता हीच सकारात्मक जीवन जगण्याची शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 10:33 PM2020-11-05T22:33:33+5:302020-11-05T22:34:00+5:30
अध्यात्मिक विचार...
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण
‘मी शेवटचा कधी बरं मनमोकळं हसलो होतो?’ स्वतःलाच प्रश्न विचारून बघा. दररोजच्या कृत्रिम जगण्यात आपण किती गुरफटून गेलोय, याची जाणीव होईल. मनमोकळं राहिल्याने मन प्रसन्न होते. मन प्रसन्न असले तर जीवनात चैतन्य संचारतं. प्रसन्नता आणि चैतन्य नुसतं आपलं जीवन सुलभ करत नाही तर आपल्या परिवाराचंही जगणं सुंदर बनवतं. प्रसन्न मन स्वर्गाची अनुभुती देणारं आहे, तर दुःखी मन म्हणजे साक्षात नर्क. तरीही आपण मन मारून का जगत असतो. जबाबदारी, संकट, प्रश्न, काम, समस्या फक्त आपल्याच वाट्याला आल्यात का? अजिबात नाही.
जीवनातील चढ-उतार दैवी महापुरुषांना, ज्ञानी संत-माहात्म्यांना चुकले नाहीत, त्यापुढे आपली काय गत. थोडक्यात सांगायचं तर, अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील म्रुगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. त्यामुळे, अडचणींच्या ओझ्याखाली ‘मन’मारुन जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा ‘मना’पासून प्रयत्न करायला हवा. मनाची ताकद फार मोठी आहे. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मनापासून केलेलं कोणतेही कार्य सिद्धीस जाते. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असायला हवं. मनाची प्रसन्नता लढण्याची सकरात्मक शक्ती आपल्या पाठीशी उभी करते. म्हणून तर संत महात्म्यांनी मनाला आवर घालून त्याला प्रसन्न करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे.
“मन मनासि होय प्रसन्न | तेव्हां वृत्ति होय निरभिमान”
या अभंगातून संत एकनाथ महाराज आपली वृत्ती निराभिमान होण्यासाठी मनाला प्रसन्न करून घेण्याचा सल्ला दिलाय. तर, संत तुकाराम महाराजांनी “मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण” या अभंगातून मनाची प्रसन्नता आपल्या सर्व सिद्धीचे कारण असल्याचं सांगितलंय. आपलं मन हे एक दैवत आहे.. या मनो दैवताला प्रसन्न केलं तर कुठलंही कार्य सिद्दीस जाण्यास वेळ लागत नाही, म्हणून मनाला प्रसन्न करण्याचा उपदेश महाराज करतात.
- ह. भ. प. भागवत सुरवसे महाराज
सोलापूर