दुहेरी पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना २४ तास पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:16 PM2019-01-09T12:16:02+5:302019-01-09T12:46:21+5:30
सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे कोटी रुपये दिले. या योजनेमुळे शहरवासीयांना २४ तास पाणी मिळणार असून माता-भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही.
सोलापूर - सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे कोटी रुपये दिले. या योजनेमुळे शहरवासीयांना २४ तास पाणी मिळणार असून माता-भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. एक हजार कोटींच्या योजना सोलापूरला मोदी यांनी दिलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण शहराचा कायापालट होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात झालेल्या सभेत बुधवारी सांगितले.
फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात सिद्धरामेश्वराची नगरी आणि पांडुरंगच्या आशीर्वाने केली. ते म्हणाले, ही खरोखरच कर्मयोग्याची भूमी असून गरीब आणि कष्टी कामगार येथे उपस्थित आहेत, ते खरोखरच कर्मयोगी आहेत. कष्टकऱ्यांसाठी सोलापुरात ३० हजार घरे उभी करण्यात येत आहेत, या घरांसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे अभिवचन त्यांनी आडम मास्तर यांना दिले. तांत्रिक त्रुटी, बँक गॅरंटी या सगळ्यातून मार्ग काढृन हा प्रकल्प पूर्ण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस म्हणाले, २०१४ साली मोदींनी जे आश्वासने दिली ती सर्व पूर्ण केली आहेत. शहर आणि गावाचा समतोल विकास झाला पाहिजे, तरच देशाचा समतोल विकास होईल यासाठी सोलापूरला एक हजार कोटी दिले आहेत.यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांनी केंद्राची मदत मिळण्यासाठी मागणी केली होती, त्यांनी पथक पाठवून पाहणी केली आणि आता ही मदत लवकरच मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. जिल्ह्याभोवती गुळगुळीत रस्त्याचे जाळे निर्माण केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. येथे सांडपाण्याचा मोठा प्रकल्प उभा राहात असून येथील अतिरिक्त पाणी एनटीपीसीला विकण्यात येणार आसून त्यातून आलेल्या पैशांमधून शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.