सोलापूरकरांच्या निवेदनाची ‘पीएमओ’ कार्यालयाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 02:24 PM2020-02-01T14:24:58+5:302020-02-01T14:27:29+5:30
पीएमओ कार्यालयाची स्पष्टता;‘उडान’ ची विमानसेवा सुरु करू, आधी चिमणी हटवा !
सोलापूर : उडान योजनेत सोलापूरचा समावेश आहे़ सोलापुरात अद्याप विमान सेवा सुरू झालेली नाही़ त्यामुळे सोलापुरात लवकरात लवकर विमान सेवा सुरू व्हावी, अशा मागणीचे निवेदन सोलापुरातील उद्योजक तसेच नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंदन जाधव यांनी थेट त्यांच्या नावे पीएमओ कार्यालयाला पत्र पाठवून विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली़ यासोबत सोलापुरातील उद्योजकांनीही याबाबत पीएमओ कार्यालयाला पत्र पाठवले आहे़ सोलापुरातील त्या वाद्ग्रस्त चिमणीकडे बोट दाखवत विमान सेवा सुरु करण्यास ‘पीएमओ’ कार्यालयाने नकार दिला.
भारतीय वायू सेवा सुरक्षा कायद्यांतर्गत सोलापुरात विमान सेवा सुरु करता येणार नाही, असा खुलासा करणारा मेसेज पंतप्रधान कार्यालयाकडून आला आहे. जोपर्यंत चिमणीचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सोलापुरात विमान सेवा सुरू करता येणार नाही़ असे उत्तर आल्यानंतर सोलापूरकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे़ पंतप्रधान कार्यालयाकडून काही हालचाली होतील आणि सोलापुरात विमान सेवा सुरु होईल, अशी अपेक्षा सोलापूरकरांना होती़, विशेष करून उद्योजकांना़ पण, त्यांच्याकडूनही नकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी विरोधात उद्योजकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून २४ जानेवारी २०१८ साली सोलापूर विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात आला होता़ होटगी रस्त्यावरील हवाई अड्डा अर्थात विमानतळावर विमान उड्डानाला सिद्धेश्वर साखर कारखान्यातील चिमणी अडथळा ठरत आहे़ चिमणीचे प्रकरण राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयातही गेले़ न्यायालयाने चिमणी पाडण्याचे आदेश दिले.
त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चिमणी पाडकामाला सुरुवात करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले़ त्यामुळे सोलापूर महापालिकेने चिमणी पाडण्याचे टेंडरही निघाले़ काही दिवसात चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरु होणार होती़ त्यापूर्वीच राज्यात सरकार बदलले़ सरकार बदलल्यानंतर चिमणी पाडकामाचा विषय मागे पडला़ त्यामुळे याबाबत पुढे काय होईल कोणाला काहीच माहिती नाही़ त्यामुळे विमानसेवेचाही प्रश्न अधांतरी राहिला आहे.
..तर सहा महिन्यात सेवा सुरू!
- ६ जानेवारी रोजी मी पंतप्रधान कार्यालयास सोलापुरात विमान सेवा सुरु करण्याची मागणी केली़ त्यानंतर एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या रिजनल जनरल कनेक्टिव्हिटी स्क्रीमचे कार्यकारी अधिकारी राज मलिक यांच्याकडून चिमणी प्रश्न सुटल्यानंतर सहा महिन्यात विमान सेवा सुरु करता येर्ईल, असा खुलासा करणारे पत्र मिळाले. चिमणी प्रश्न सुटल्याशिवाय विमानसेवा सुरु करता येणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ त्यांच्या उत्तरावर मी असमाधान व्यक्त केले आहे़ सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी, अशी पुन्हा मागणी पीएम पोर्टलवर केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंदन जाधव यांनी सांगितले.