कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे सोलापूरात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 08:24 PM2018-02-23T20:24:53+5:302018-02-23T20:24:53+5:30
मराठी आणि तेलुगू साहित्याचा पुल बांधणारे आणि आपल्या आशयघन कवितांनी अवघ्या मराठीजनांना प्रिय असलेले कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज सायंकाळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सोलापूर : मराठी आणि तेलुगू साहित्याचा पुल बांधणारे आणि आपल्या आशयघन कवितांनी अवघ्या मराठीजनांना प्रिय असलेले कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज सायंकाळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर श्निवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. कवीवर्य बोल्ली यांच्या पश्चात पत्नी शोभा बोल्ली, दोन मुले, तीन विवाहित मुली, बंधू सत्यनारायण बोल्लीअसा परिवार आहे.
बोल्ली हे मधुमेह आणि हृदयविकाराने आजारी होते. दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर येथील मार्कंडेय रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठिक होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लेखनासाठी बसले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
तेलुगू आणि मराठी भाषेच्या आंतरभारतीची भूमिका घेऊन ते आयुष्यभर लेखनमग्न राहिले. प्रख्यात नाटककार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. शिवाय ते उत्तम चित्रकार होते. कवीवर्य बोल्ली यांच्या साहित्यसेवेचा तत्कालीन आंध्रप्रदेशातही गौरव झाला होता. हैदराबादच्या पोट्टी श्रीरामलू तेलुगू विद्यापीठाने सन २००५ मध्ये डी. लीट. ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.
तेलुगू भाषिक असलेल्या बोल्ली यांच्या लेखनाचा प्रवास १९७८ साली ‘मैफल’ या काव्यसंग्रहाने सुरू झाला. या काव्यसंग्रहाला बा. भ. बोरकरांची प्रस्तावना लाभली होती. १९८२ मध्ये ‘झुंबर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले होते. १९९६ मध्ये त्यांनी सहा साहित्यकृती लेखनाचा षटकार मारला होता. यामध्ये सावली (काव्यसंग्रह), गवाक्ष (,ललित लेख संग्रह), तेलुगू फुलांचा मराठी सुगंध (तेलुगू - मराठी भाषेचा तौलनिक अभ्यास), एका पंडिताचे मृत्यूपत्र, विरहिणी वासवदत्त (काव्यनाट्य) आदी साहित्यकृतींचा समावेश आहे.
कवीवर्य बोल्ली यांनी श्याम मनोहर यांच्या ‘यकृत’ नाटकाचा तेलुगू भाषेत अनुवाद करून बोल्लीू यांनी आंध्रात या नाटकाला लोकप्रियता मिळवून दिली होती. ‘एका साळियाने’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात रसिकप्रिय ठरले. ‘कवीराय रामजोशी’, कृष्णदेवराय या कादंबºयाही रसिकांना प्रभावित करून गेल्या. बोल्ली यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त होत असून, मराठी साहित्यातील एक अग्रगण्य साहित्यिक हरपला, अशा भावना येथील साहित्यविश्वातून व्यक्त होत आहेत.
ज्ञानेश्वरभक्त कवी
कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली हे तेलुगू भाषिक होते; पण मराठीत त्यांनी अजोड साहित्यनिर्मिती केली. ही ज्ञानेश्वर माऊलींची कृपा असल्याचे ते सांगत. आपल्या निवासस्थानी बैठकीच्या खोलीत माऊलींची मोठी प्रतिमा त्यांनी ठेवली होती. माऊलींपुढे नतमस्तक होऊनच त्यांच्या दिवसाची आणि लेखनाची सुरूवात होत असे. पहाट आणि सांजवेळी लेखन करणे त्यांना नेहमी आवडायचे.