शिलाई काम करीत अल्पशिक्षित नीलावतींनी साकारला वेदनेचा कवितासंग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:24 PM2019-07-01T17:24:34+5:302019-07-01T17:32:36+5:30
कुर्डूवाडीतील कवयित्री नीलावती कांबळे याच्या जीवनप्रवासावर एक नजर
इरफान शेख
कुर्डूवाडी : जीवनभर वेदना सहन करीत वेदनाच बनली त्यांची कविता, अशी हृदयद्रावक कथा आहे कुर्डूवाडीतील कवयित्री नीलावती कांबळे यांची. अनेक जाच-जपाट्यातून त्यांनी आपल्या वेदना एकत्र करीत लिहिलेल्या कवितांचाच संग्रह करून त्याचे प्रकाशन केले़ आज त्या कवयित्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
पतीच्या निधनानंतर जीवनाचं रहाटगाडगं हाकत असताना त्या आजही माढा रोडवर छोट्या दुकानात शिलाईचे काम करतात. मिळालेल्या पैशातून उपजीविका व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवितात. स्वत: सहावी शिक्षित आहेत. जीवनात एवढ्या वेदना असतानाही त्यांनी आपल्या मुलाला अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकवीत आहेत़ मुलगी १२ वी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेत आहे.
लग्न झाल्यानंतर त्यांनी अनेक वेदना भोगल्या़ पतीचे , तो कागद जरी घरच्यांच्या हाती लागला तरी मार खावा लागायचा. अनेक वेळा कागदावर शाईपेक्षा अश्रूच जास्त पडायचे.
पतीच्या निधनानंतर त्यांनी ‘वास्तव’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला़ या कवितासंग्रहात ‘दारूने लावली याच्या आयुष्याची वाट’, ‘काळजातील जखमा’ , ‘स्त्रीभ्रूणहत्या’, ‘जन्म मला घेऊ द्या’, ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’, ‘आई देवाहून थोर’, ‘मुलींवरील अत्याचार रोकू या’, ‘छकुलीची आर्त हाक’, ‘दुष्काळाचा कहर’, ‘अन्यायाला वाचा फुटेल का?’, ‘नाती-गोती’, ‘माणुसकीचा दुष्काळ’ अशा सुमारे ६० विषयांवर त्यांनी प्रकाश टाकत समाजाला सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या लेखणीची भाषा अगदी साधारण, घरगुती वापरातील शब्दरचनेत असल्याने लिखाण हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही.
लवकरच आत्मकथेचे प्रकाशन
दुसरा ‘बालजगत’ नावाचा लहान मुलांसाठी व ‘डोह वेदनेचा’ असे कवितासंग्रह त्यांनी लिहिले आहे़ आर्थिक अडचणींमुळे ते प्रकाशनाअभावी राहिले आहेत. त्यांनी ‘व्यथा एका अभागी स्त्रीची’ ही स्वत:च्या जीवनावरची आत्मकथा लिहिण्याचे काम सध्या सुरू आहे़ आयुष्यात जगलेले अभागी जीवन व त्यातून काढलेला सकारात्मक मार्ग याविषयीचे लिखाण आहे. आपला संदेश देताना कवयित्री नीलावती कांबळे म्हणतात की, ‘ज्या स्त्रिया अन्याय सहन करतात, त्यांनी स्वत: अन्याय सहन करू नये व इतरांवरही अन्याय करू नये, खडतर जीवनातून माझी वाटचाल सुरू असून उद्या आपली परिस्थिती सुधारल्यावर समाजाला मदत करा’ असा मोलाचा संदेश त्यांनी मुलांना दिला आहे़